तुमचं मानसिक आरोग्य उत्तम असणं महत्त्वाचं !
उरुळी कांचन : आज आपली बदललेली जीवनशैली फारच धकाधकीची आहे. आजच्या बदललेल्या काळाचा ताण सर्वांनाच आलेला दिसून येत असतो. या ताणामुळे आधी मनाचं व नंतर शरीराचं स्वास्थ्य बिघडतं. त्यातही महिलांना कुटुंबापासून तर नोकरी करेपर्यंत तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे महिलांनी मानसिक आरोग्य उत्तम ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे.
आजच्या स्पर्धेच्या युगात माणूस एकीकडे भौतिक सुखही अनुभवत असतो आणि दुसरीकडे मानसिक आरोग्य गमावून बसतो. मनात बेचैनी व असमाधान असेल तर शारीरिक आरोग्यावर त्याचा परिणाम होणारच. यामुळे मधुमेह, हृदयरोग, पक्षघात, रक्तदाब असे आजार होऊ शकतात.
अतिसंताप, अतिदुःख व चिंता यांचा हृदयावर आघात होतो. यासाठी विचारांवर, मनावर नियंत्रण करायला शिकलं पाहिजे. मन:शांती मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मनावर ताबा ठेवायला हवा. पैसा गेला तर परत मिळवता येतो, पण प्रकृती एकदा बिघडली, तर ती पूर्ववत व्हायला वेळ लागतो.
कुठल्याही गोष्टीचा फार ताण घेऊ नका. त्यामुळे धावत्या जीवनशैलीतही आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी राहा सतत निरोगी, फिट आणि आनंदी. निरोगी, फिट आणि आनंदी राहण्यासाठी वेगळं असं काहीच करायची गरज नाही, आपल्या जीवनशैलीत काही बदल करून घ्या.
त्यासाठी काही महत्वाच्या टिप्स :
– सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू पिळून ते पाणी प्यावे किंवा एक कप ग्रीन टी प्यावा.
– योगा किंवा कुठलाही व्यायाम अर्धा तास करावा.
– प्राणायाम किंवा ध्यान करावं.
– भिजवलेले बदाम, आणि एखादं फळ खावं.
– सकारात्मक विचार करून दिवसभराचं प्लॅनिंग करावं.
– अंघोळीला जाण्यापूर्वी तेलाने ३ मिनिटे मसाज करावा.
– घरच्या घरी हळद, डाळीचं पीठ, दूध एकत्र करून तो फेसपॅक चेहऱ्याला लावावा.
– नाश्ता करूनच ऑफिससाठी निघाव.
– दुपारी पोषक जेवण करा.
– संध्याकाळी हेल्दी स्नॅक्स घ्या.
– ऑफिसवरून आल्यावर, स्वतः साठी वेळ काढा, संगीत ऐका, वाचन करा.
– रात्रीचा आहार हलका घ्या.
– टीव्ही पाहत असताना गरम पाण्यात मीठ घालून त्यात काही वेळ पाय बुडवून ठेवावेत, म्हणजे थकवा जाईल.
– रात्री किमान सात तास झोप घ्या.
– रात्री झोपण्यापूर्वी १ ग्लास दूध प्यावं.
– महिन्यांतून एकदा किमान फेशियल किंवा बॉडी मसाज करावा.
– वर्षातून दोन वेळा काही दिवस सुट्टी घेऊन फिरायला जा.