मुलींनी जोडीदार निवडताना काय पाहावे ?
उरुळी कांचन : बदलत्या काळात लग्नासाठी जोडीदार शोधताना तरुण-तरुणींच्या अपेक्षा बदललेल्या आहेत. आर्थिक सुरक्षितता, करिअरसाठीचे स्वातंत्र्य, निर्व्यसनी तसेच तो कुणाशी कसे वागतो, एकंदरीत कुटुंबात आणि समाजात कसा वागतो याला मुलींकडून महत्त्व दिले जात आहे. आयुष्याचा जोडीदार म्हणून निवड करताना मुलगी आणि पालकांनी कोणत्या गोष्टींचा विचार करावा याविषयी काही महत्वाच्या टिप्स…
१. मुलाकडे आर्थिक स्थैर्य आहे की नाही हे बघावे. पैसे महत्त्वाचे नाही, असे म्हणायला सोपे असते; पण किमान सुस्थिरता असणे आवश्यक आहे.
२. दोघांचे विचार जुळतात का ते बघावे. सगळेच जुळतील असं नाही; पण आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टीत साम्य असल्यास बाकीच्या गोष्टी सांभाळल्या जातात.
३. मुलगा आपल्या आई-वडिलांबद्दल कसा बोलतो हे बघावे. तो स्वतः च्या आई-वडिलांना योग्य आदर- सन्मान, वृद्धापकाळी त्यांची काळजी आपल्याला घ्यायची आहे, असे काहीच म्हणत नसेल तर अवघड आहे. जो मुलगा आपल्या जन्मदात्याच्या कर्तव्याबाबतीत जागरूक नाही, तो उद्या इतर जवाबदाऱ्या कशा काय सुरळीत पार पाडेल, याबद्दल शंकाच आहे.
४. ज्याप्रमाणे मुलीला सासरच्या नातेवाइकांना आपलेसे करून घ्यायचे असते त्याप्रमाणेच मुलीचे आई- वडील/ नातेवाईकदेखील आपले आहेत, अशी निदान जरा व्यापक भूमिका असणारा असावा.
५. मुलगा विचारी असावा. आयुष्यात कसा जोडीदार हवा, काय अपेक्षा आहेत, या प्रश्नांवर त्याने स्वतः विचार केलेला आहे की नाही, हे तुम्हाला त्याच्याशी बोलताना लक्षात येईलच.
६. सरळमार्गी, निर्व्यसनी असल्यास उत्तम. पूर्वी काही रिलेशनशिप असल्यास त्याबद्दल आधीच खातरजमा करून घ्यावी.
७. स्त्रियांविषयी त्याचे सर्वसाधारण मत जाणून घ्यावे. आपल्या पत्नीच्या मताला मान देण्याची, तिच्या भावना सहृदयतेने निदान ऐकून घेण्याची वृत्ती असलेला असावा.
८. बऱ्याच मुलांना आपली बायको ही आईप्रमाणे आपली काळजी घेईल अशी समजूत असते. उदा. स्वयंपाक करणे, जेवण वाढणे, पाणी/चहा आणून देणे. त्यामध्ये काही चुकीचे नाही. प्रत्येकाच्या जोडीदाराकडून वेगवेगळ्या अपेक्षा असतात. तुम्हाला ते जमणार आहे का हे बघावे.
९. मुलगा कॅफे, रेस्टॉरंटमधल्या कर्मचाऱ्यांशी, कॅब ड्रायव्हर्सशी कसा वागतो ते बघावे.
१०. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्हाला कंट्रोल करण्याची, जाब विचारण्याची सवय मुलाला नाही ना हे बघावे. असे करण्याचे कारण विश्वासाचा अभाव हेच असते आणि त्यामुळे नात्यामध्ये तणाव निर्माण होतो.
११. स्वतःशी चूक स्वीकारण्याची वृत्ती आहे का हे जाणून घ्यावे. तुमच्या उत्कर्षात हातभार लावण्याची, आनंदी होण्याकरिता लागणारा मनाचा मोठेपणा आहे का हे बघावे. स्वार्थी, स्वकेंद्रित स्वभाव नाही ना हे तपासावे.
एकंदर आपली तात्कालिक आणि जीवनाची अंतिम उद्दिष्टे तसेच स्वतः चा स्वभाव लक्षात घेऊन यामध्ये अजून भर घालता येईल. दोघांनी एकत्र मिळून, एकमेकांना सांभाळत, जबाबदाऱ्यांना तोंड देत सुखी-समाधानी जीवन जगणे आणि ऐहिक, वैचारिक, बौद्धिक अशा सर्वच पातळीवर उन्नत होणे हे साधता येईल का, हे जोडीदार शोधताना प्रामुख्याने बघावे असे सध्यातरी बघणे जरूरी आहे.