पुण्यात ‘महिलांचे राज्य’…! येत्या 8 मार्चला 11 सरकारी कार्यालयामध्ये महिला सांभाळणार जबाबदारी…

पुणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुण्यातील दुय्यम निबंध कार्यालयाचा कारभार महिलांच्या हाती सोपविण्यात येणार आहे. याठिकाणी दस्त नोंदणीची सर्व कार्यवाही महिलाच करणार आहेत. शहरातील 27 पैकी 11 दुय्यम निबंधक कार्यालये केवळ महिला पक्षकार व महिला वकिलांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे यांनी दिली आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना मालमत्ता हक्क व कायदेशीर सक्षमीकरणाच्या दृष्टीने प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर महिला पक्षकार व वकिलांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे.महिलांनी महिलांसाठी या विशेष उपक्रमांतर्गत सहजिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे शहर कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या 11 सहदुय्यम निबंधक कार्यालये केवळ महिला पक्षकार व महिला वकिलांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहेत.
सशक्त महिला, सक्षम समाज महिलांचा सन्मान, प्रगतीची नवी ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार, तसेच त्यांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय कार्याचा गौरव करण्यासाठी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो.

महिला दिनानिमित्त या कार्यालयांमध्ये केवळ नोंदणीसाठी महिला खरेदीदाराच्या लाभातील खरेदीखत/करारनामे दस्तांची नोंदणी, महिला पक्षकारांच्या मृत्युपत्राचा दस्त, महिला पक्षकारांच्या लाभातील कुलमुखत्यारपत्रांचे दस्त, ज्या दस्तांमध्ये पक्षकार महिला नसतील; परंतु ओळख देणारी महिला वकील असेल असे सर्वसाधारण दस्तऐवज स्वीकारले जातील.
सह दुय्यम निबंधक हवेली क्र. १, २, ५, ७, १०, ११, १४, १५, १९, २६, व २७ ही कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत. या दिवशी या सर्व कार्यालयांमध्ये दुय्यम निबंधक म्हणून महिला कर्मचारी काम पाहणार आहेत. सर्व महिला पक्षकार व महिला वकिलांनी या विशेष उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंगाणे यांनी केले आहे.