मोठी बातमी! जिल्हा परिषदेतील महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ, आता होणार वसुली..

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

आधी सरसकट मंजूरी आणि खात्यावर जमा होणाऱ्या लाभामुळे लक्षवेधी ठरणारी लाडकी बहीण योजना पडताळणीच्या फेरीत आणि नंतर अपात्र बहिणींच्या याद्यांमध्ये अडकली . निवडणुकांपूर्वी सरसकट महिलांना लाभ देणारे सरकार आता महिलांची गळती करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत .
पण या योजनेबाबत रोज नवनवीन त्रुटी आणि गैरव्यवहार बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता तर चक्क हजारोंपेक्षा जास्त जिल्हा परिषदमधील कार्यरत असलेल्या महिलांनी याचा लाभ घेतला असल्याची बाब उघडकीस आली आहे आणि त्याबद्दल शासन कारवाई करण्याचे निर्देश महिला व बालविकास विभागाने संबंधित अधिकाऱ्याला दिले आहेत.

याबद्दलचं पत्र आमच्या हाती लागलेलं आहे. लाडकी बहीण योजने संदर्भात लाभ घेणारे अनेक गैरमंडळी समोर आल्या आहेत. त्यामध्ये पुरुषांचा देखील समावेश आहे. त्यामुळे आता ह्याला कात्री लावण्यासाठी महिला आणि बालविकास विभागाने अंतर्गत चौकशी लावलेली आहे.
बुलढाण्यात ही संख्या सर्वाधिक असून सोलापूर धाराशिव बीड लातूर या जिल्ह्यांमध्येही महिला कर्मचाऱ्यांनी सर्वाधिक लाभ घेतल्याची माहिती पुढे आली आहे. एका घरामध्ये दोन पेक्षा अधिक महिलांना लाडके बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही .मात्र दोन पेक्षाही अधिक महिलांनी लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींची यादी सरकारने तयार केल्या आहेत .
त्यानुसार तब्बल २६ लाख महिलांची यादी महिला व बालकल्याण विभागाने तयार केली असून या महिलांची चौकशी करण्यास सुरुवात झाली आहे . यात आता जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या एक हजाराहून अधिक महिलांचा समावेश असल्याचं उघडकीस आलंय .
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यात सध्या २ कोटी २९ लाख महिलांना लाभ मिळत आहे. मात्र, एकाच कुटुंबातील केवळ २ महिलांची छाननीचा निकष पूर्ण झाल्यानंतर आणखी लाखो महिला लाडकी बहीण योजनेतून वगळल्या जाणार आहेत. तर, जिल्हा परिषद कर्मचारी महिलांनाही आता योजनेतून वगळण्यात येईल.