Women Safety : महिला सुरक्षेसाठी अजितदादांचा मोठा निर्णय, कोट्यवधी ‘बहिणींना फायदा, जाणून घ्या…
Women Safety : महाराष्ट्रात सध्या महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बदलापूर येथील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्रासह देशभर या घटनेचे पडसाद उमटले आहे.
याचदरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रीमंडळाने महिला अत्याचाराच्या प्रकरणांनतर महत्त्वाचं पाऊल उचलत ऑनलाईन तक्रार दाखल करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्देशांवर विचार केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी जळगावमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी महिलांवरील अत्याचारांच्या प्रकरणावर चिंता व्यक्त करताना त्यांनी महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता देण्याचे म्हटलं होते.
पंतप्रधानांनी यावेळी बोलताना सांगितले, की भारतीय दंड संहितेमध्ये महिला आणि लहान मुलांविरुद्धच्या गुन्हांबद्दल संपूर्ण प्रकरण आहे. जर एखादी महिला गुन्ह्यावेळी पोलीस स्टेशनला पोहोचू शकली नाही, तर ती ई-तक्रार दाखल करू शकते. तसंच ऑनलाईन केलेली तक्रार नंतर पोलिसांना बदलता येणार नाही. Women Safety
याबाबत बोलताना अजित पवारांनी सांगितलं, की पंतप्रधान मोदींनी महिलांवर होणाऱ्या गुन्ह्यांसाठी ऑनलाईन तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ही ऑनलाईन तक्रार दाखल करण्याची सुविधा त्वरित लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महिलांवरील अत्याचारासारखी प्रकरणं दिवसेंदिवस वाढत असून हे गुन्हे रोखण्यासाठी एक वेगळा दृष्टीकोन स्वीकारण्याची गरज आहे. कॅबिनेट बैठकीत या मुद्द्यावर गंभीरतेने चर्चा करण्यात आली असल्याचंही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मुद्द्यावर बोलताना असंही सांगितलं, की या महिलांवरील या गुन्ह्यांमध्ये आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे. या प्रकरणांमध्ये गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हावी आणि हे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.