बलात्कार झालाच नाही! महिलेने अचानक स्टेटमेंट बदलले, बुलढाणा सामूहिक बलात्कार प्रकरणाला नवं वळण…

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील राजूर घाटात आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तपासात वेगळीच माहिती समोर आली आहे. राज्यात खळबळ माजवून देणाऱ्या कथित बलात्कार प्रकरणात आता नवा ट्विस्ट निर्माण झालाय.
राजूर घाटात पोलिसांनी कसून तपास केला. कारण एका महिलेनं याच ठिकाणी तिच्यावर आठ जणांनी बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला होता.
या घटनेनंतर आमदार संजय गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आठ आरोपींच्या विरोधात बलात्कार, लूटमार आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले.
तर पीडित महिलेनंच पौलिसांच्या चौकशीत बलात्कार झालाच नसल्याचे सांगत मेडिकल करण्यास नकार दिला. माझ्यावर कोणताही लैंगिक अत्याचार झालेला नाही.
फक्त आरोपींनी आमच्याकडील पैसे, मोबाईल आणि आमचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची आणि समाजात बदनामी करण्याची धमकी दिली, आरोपी तिथून निघून गेले, असे या ३४ वर्षीय महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
लैंगिक अत्याचार झालेलाच नाही. त्यामुळे माझ्या वैद्यकीय तपासणीचीही गरज नाही, असे या महिलेने पोलिसांना आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना लिहून दिले आहे.
तसेच राजुर घाटात मागील काही काळात लूटमार, हाणामारी आणि छेडछाडीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणातही गांभीर्याने तपास केला.
दरम्यान, राज्यभरात खळबळ माजवणाऱ्या या प्रकरणात महिलेनेअशी भूमिका का घेतली? किंवा कुणाच्या दबावात ही महिला खरे बोलायला घाबरत आहे का ? असा गंभीर प्रश्न या निमित्ताने निर्माण झालाय.