लिफ्टमध्ये अडकली महिला, तीन दिवस मागत होती मदत, अखेर तडफडून..

नवी दिल्ली : लिफ्टमध्ये अडकल्यानं महिलेचा तडफडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. महिला तीन दिवस मदतीसाठी आक्रोश करत होती. तिचा आरडाओरडा सुरू होता. मात्र तीन दिवस कोणाचंच लक्ष गेलं नाही.

अखेर तिनं लिफ्टमध्येच तडफडून जीव सोडला. वीज पुरवठा खंडित झाल्याने नवव्या मजल्यावर लिफ्ट अडकली. त्यामुळे महिला आत अडकून पडली. घटना उझबेकिस्तानच्या ताश्कंदमधली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, तीन मुलांची आई असलेली ३२ वर्षीय ओल्गा लियोन्टिवा डिलिव्हरी ड्रायव्हचे काम करायची. गेल्या आठवड्यात ती सामान डिलिव्हरी करण्यासाठी एका इमारतीत गेली होती.

इमारतीमधील लिफ्ट खराब असल्याची कल्पना तिला नव्हती. ओल्गा लिफ्टमध्ये गेल्यानंतर काही वेळात लिफ्ट जाम झाली. या दरम्यान वीज पुरवठा खंडित झाला.
वीज पुरवठा खंडित होताच लिफ्टचा दरवाजा लॉक झाला. ओल्गा आतमध्ये अडकली. तीन दिवस ती लिफ्टमध्येच होती. मदतीसाठी तिनं आरडाओरडा केला. मात्र तिचा आवाज कोणापर्यंतच पोहोचला नाही. तीन दिवसांनंतर ओल्गाने जीव सोडला.
ओल्गा घरी न पोहोचल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस ओल्गा सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी गेलेल्या इमारतीत पोहोचले. त्यांनी इमारतीत झाडाझडती घेतली. तेव्हा लिफ्टमध्य ओल्गाचा मृतदेह सापडला.
