घराजवळच ६ महिने ५ स्टार हॉटेलमध्ये राहिली महिला, रूममधील गोष्टी पाहून पोलिसांना बसला धक्का, नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगर: शहरात एक अतिशय धक्कादायक आणि रहस्यमय प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पडेगावच्या चिनार गार्डन भागातील कल्पना त्र्यंबकराव भागवत (वय.४५) ही महिला तब्बल सहा महिन्यांपासून जालना रोडवरील ॲम्बेसेडर या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहात असल्याचं उघड झालं आहे.

शहरातच राहात असूनही ती एवढ्या महागड्या हॉटेलमध्ये इतक्या दीर्घ काळ राहिली, यामागे तिचा नेमका उद्देश काय, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शनिवारी (२२ नोव्हेंबर) पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर सिडको पोलिसांनी हॉटेलमध्ये धाड टाकली.
हॉटेल व्यवस्थापनाकडून गेस्ट लिस्ट आणि कागदपत्रांची छाननी केल्यानंतर तिच्या आधारकार्डवर फेरफार झाल्याचं स्पष्ट दिसून आलं. त्यानंतर तिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू झाली. चौकशीत तिने आपलं वास्तव्य पडेगावमधील असल्याचं सांगितलं, तेव्हा पोलीसही आश्चर्यचकित झाले.

शहरातील रहिवासी असूनही, ती सहा महिने पंचतारांकित हॉटेलमध्ये राहते. एवढा खर्च कसा आणि का? याबाबत विचारणा केली असता ती सतत टाळाटाळ करत आहे. तिची उत्तरं दिशाभूल करणारी आणि संदिग्ध असल्याने पोलिसांचा संशय आणखी बळावला.
दरम्यान, याहूनही अकल्पित बाब म्हणजे, तिच्याकडे UPSC च्या २०१७ मधील निवड यादीची एक छापील प्रत आढळली. ज्यात तिचं नाव 333 क्रमांकावर असल्याचा उल्लेख होता. मात्र छाननीत ही यादीही बनावट असल्याचं निष्पन्न झालं.
त्या यादीविषयी देखील तिने कोणतीही स्पष्ट माहिती न दिल्याने तिच्या उद्देशांवर अधिक प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तिच्या मोबाइल फोनमध्ये दोन सिमकार्ड वापरल्याचंही समोर आलं असून याचा तपासही सुरू आहे. बनावट ओळखपत्र देऊन हॉटेलमध्ये राहिल्याप्रकरणी तिच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिला अटक केली आहे.
रविवारी (२३ नोव्हेंबर) न्यायालयात हजर केल्यानंतर तिला २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तिचा आर्थिक स्त्रोत, हॉटेलमध्ये दीर्घ मुक्कामामागील कारणं, बनावट कागदपत्रांचा वापर आणि इतर कोणते हेतू आहेत का? याबाबत पोलीस कसून चौकशी करत आहे