पुण्यातील बंगल्यात एकटीच राहायची महिला; 2 दिवस घर बंद…परतताच महिलेला बसला मोठा धक्का

पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर परिसरात चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. बंद असलेल्या बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल 28 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले.

घरमालक महिला दोन दिवसांसाठी माहेरी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
निरगुडसर येथील वळसे मळा परिसरात शीला सोनु वळसे पाटील या आपल्या बंगल्यात एकट्याच वास्तव्यास आहेत. 21 मार्च रोजी वाफगाव येथे यात्रेनिमित्त त्या दोन दिवसांसाठी माहेरी गेल्या होत्या. घर बंद असल्याची खात्री करून अज्ञात चोरट्यांनी बंगल्याचे कुलूप तोडत आत प्रवेश केला आणि चोरीचा डाव साधला.

शनिवारी (दि. 21) सायंकाळी शीला वळसे पाटील घरी परतल्या असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता संपूर्ण घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले आणि कपाटाचे लॉकर तोडलेले आढळले. चोरट्यांनी कपाटातील तब्बल 28 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. ही अवस्था पाहून त्या हादरल्या असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. भरवस्तीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर चोरी झाल्याने निरगुडसर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे. आरोपींचा लवकरच माग काढला जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.