७० हजार कोटीचा आरोप मागे घ्या, तीच…, अजितदादांवर अंत्यसंस्कार होताच संजय राऊतांनी केली मोठी मागणी

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामती येथे विमान अपघातामध्ये निधन झाले. अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अजित पवार यांना शेवटचा निरोप द्यायला राज्यभरातून हजारोंचा जनसमुदाय बारामतीत जमला होता.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, नितीन गडकरी, रामदास आठवले, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह राज्य आणि देशातील बडे नेते अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथे उपस्थित होते.
पार्थ पवार आणि जय पवार या दोन्ही मुलांनी अजित पवार यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यानंतर काहीवेळातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमधून संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजपला लक्ष्य केले आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे नवा वाद निर्माण झाला असून त्यांनी थेट भाजपावर टीका करत मोठी मागणी केली आहे.अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर अनेक कार्यकर्ते आणि समर्थक आपल्या गावी परतले असतानाच, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून खळबळ उडवून दिली. त्यांनी भाजपावर सडकून टीका करत अजित पवार यांच्याशी संबंधित जुन्या आरोपांबाबत मोठी मागणी मांडली आहे.
संजय राऊत यांनी आपल्या एक्स खात्यावर केलेल्या पोस्टमध्ये भाजपाने अजित पवार यांच्या निधनानंतर २९ जानेवारी रोजी बहुसंख्य मराठी वर्तमानपत्रांमध्ये पानभर जाहिराती देत श्रद्धांजली अर्पण केल्याचा उल्लेख केला.
या जाहिरातींवर टीका करत त्यांनी, “भाजपाने दादांना श्रद्धांजली देण्यासाठी मोठ्या जाहिराती दिल्या, पण त्याचा उपयोग काय?” असा सवाल उपस्थित केला आहे. त्याचबरोबर त्यांनी म्हटलं आहे की, अजित पवार यांच्यावर करण्यात आलेले ७० हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप मागे घेणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
राऊत यांनी स्पष्टपणे नमूद केलं की, भाजपाकडून, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी अजित पवार यांच्यावर केलेले ७० हजार कोटींचे आरोप मागे घेतले पाहिजेत. त्यांच्या मते, हे आरोप मागे घेणं म्हणजेच दिवंगत नेत्याबद्दल आदर व्यक्त करण्याचा योग्य मार्ग ठरेल. दरम्यान, राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असून, भाजपाचे नेते यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
