हिवाळी अधिवेशन गाजणार ; विरोधी पक्षनेते पदासाठी’ या ‘दोन नावांची चर्चा, शिक्कामोर्तब होणार?

नागपूर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून विरोधी पक्षनेते पदावरून विरोधकांनी आग्रही भूमिका मांडली आहे. महाविकास आघाडीकडून विधानसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव आणि विधान परिषदेसाठी काँग्रेस सतेज पाटील यांच्या नावावर एकमत झाल्याचे दिसून आले आहे.
राज्यातील विरोधी पक्षनेतेपदावरून महाविकास आघाडी आणि सत्ताधारी महायुतीत नवा राजकीय पेच निर्माण झाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना विधानसभा तर ठाकरे गटाचे अनिल परब यांना विधान परिषद विरोधी पक्षनेते पद दिले जाईल, अशी सहकार्याची ऑफर भाजपकडून काही मविआ नेत्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.यावर मविआ कसा प्रतिसाद देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.
दुसरीकडे विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावावर शिंदे गटाने जोरदार आक्षेप घेतला असल्याचे सांगितले जात आहे. भास्कर जाधव हे विरोधी पक्षनेते झाले तर त्यांचे मुख्य टार्गेट हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांवर राहील, अशी भीती शिंदे गटातील नेत्यांना वाटत आहे.

या उलट विजय वडेट्टीवार यांच्या नियुक्तीने टीकेचा फोकस महायुतीतील तिन्ही पक्षांवर विभागला जाईल, असा शिंदे गट आणि महायुतीमधील नेत्याचे म्हणणे आहे. त्यामुळेच जाधव यांना विरोधी पक्षनेते पद मिळता कामा नये, असा मतप्रवाह शिंदे गटात दिसत आहे.

विरोधी पक्षनेते निवडण्याचा अधिकार अध्यक्ष आणि सभापतींकडे असला तरी सत्तापक्षाचा निर्णायक प्रभाव राहतो, अशी चर्चा देखील सुरू झाली आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
