महानगरपालिका निकालानंतर उद्धव-राज ठाकरेंना सोबत घेणार? फडणवीसांनी सगळंच सांगितलं…

पुणे : राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीच बाजी मारणार असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांनी २६ महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर निवडून येईल असे छातीठोकपणे सांगितले आहे.

तर गरज पडल्यास निकालानंतर उद्धव-राज ठाकरे यांना सोबत घेणार का या प्रश्नावर असे खणखणीत उत्तर दिले आहे. राज्यातील महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र हा पंतप्रधान मोदींच्या पाठीशी आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित होईल.भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल. महायुतीचीच सत्ता महापालिकांमध्ये असेल. महाराष्ट्र कुणासोबत असेल हे अधोरेखित होईल. महाराष्ट्रातील अनेक शहरात मी प्रचारासाठी फिरलो.
मला असा विश्वास वाटतो की लोक आमच्या बाजूने आहेत. आम्ही भाजीपाल्याचा ठेला चालवणाऱ्याला आणि डॉक्टर, वकील यांना सुद्धा तिकीट दिले आहे. आम्ही टॉक शो केले. सभा घेतल्या. कोपरा बैठका घेतला. यामध्ये आम्ही विकासाचा मुद्दा अजेंड्यावर ठेवला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील २९ महापालिकांपैकी २६ ठिकाणी महायुतीचाच महापौर होईल असा दावा केला. त्यात भाजप अधिक ठिकाणी दिसेल. तर इतर ठिकाणी मित्रपक्षांचे महापौर असतील असा दावा केला. जर मुंबई महापालिकेत गरज पडली तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना सोबत घेणार का या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी खणखणीत उत्तर दिलं. अशी बिलकूल गरज पडणार नाही.
आम्ही बहुमताने महापालिकेत येऊ असा दावा त्यांनी केला. आता राजकीय युतीची कोणतीही शक्यता नसल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. दोघांशी वैयक्तिक संबंध चांगलेच राहतील असेही मुख्यमंत्री म्हणाले.