निवडणुकीला लागणार ब्रेक? सोलापूर महापालिकेची निवडणूक पुढे ढकला, का होत आहे मागणी?

पुणे:राज्यात महापालिका निवडणुकीचे पडघम वाजले असताना आपली सत्ता यावी यासाठी सर्वच पक्षांनी मोठी फिल्डिंग लावली आहे. सगळीकडे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी माजलेली असतानाच सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीला ब्रेक लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे.
सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धरामेश्वर महाराज यात्रेदरम्यानच महानगरपालिकेची निवडणूक येत असल्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे. याच कालावधीत निवडणुकीतील मतदान आणि मतमोजणी होत असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी केली आहे. त्यांनी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांना एक निवेदनही पाठवले आहे.
सोलापूर महानगरपालिकेची 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी मतमोजणी होणार आहे. या दोन दिवसात श्री. सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेचा प्रमुख सोहळ्यातील धार्मिक विधी असतात. सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेला 900 वर्षाची अखंड परंपरा आहे. या निवेदनात श्री. सिद्धरामेश्वर महाराज यांची यात्रा 14 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

आगामी महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महायात्रेचे नंदीध्वजाचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी पत्राद्वारे केली आहे. अर्थात याविषयीचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे. तुर्तास आयोगाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता ही निवडणूक पुढे ढकलली जाणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

