हवेलीत आघाडीचा पॅटर्न राष्ट्रवादीवर उलटणार ? जिल्ह्यातील बड्या नेत्याच्या सोईस्कर धोरणाने निष्ठावंतांची पंचाईत ..!!
जयदीप जाधव
उरुळी कांचन : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादी च्या बडया नेत्याच्या सूचना व आदेशांना धुडकावीत हवेलीतील राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांनी भाजपशी हात मिळवणी करीत बाजार समितीच्या सत्ताकेंद्राला पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या अधिपत्यापासून दूर ठेवण्यात यश मिळवले आहे.
बाजार समितीच्या सेवा संस्था व ग्रामपंचायत गटातही या आघाडीच्या पॅटर्नला यश मिळाल्याने आगामी निवडणूकीत हा फार्म्युला राष्ट्रवादीला अधिक धोकादायक ठरणार असताना बाजार समितीच्या निमित्ताने हवेलीतील निष्ठेच्या व्याख्येलाच पक्षातील बड्या नेत्याने या बंडखोरांना विजयानंतर पाठिशी घालण्याच्या कृतीने हवेली तालुक्यातील राष्ट्रवादीत मोठे काहूर माजले आहे. हवेलीत निष्ठावंतांची प्रातारणा व बंडखोरांना शाबासकी हे धोरण वरिष्ठांनी अवलंबिल्याने हे धोरण आगामी निवडणूकांत राष्ट्रवादीवर उलटणार असल्याच्या चर्चेला हवा मिळत आहे.
हवेली तालुक्यात १९ वर्षानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीला तालुक्याचा दर्जा मिळून निवडणूक संपन्न झाली आहे. तर सहकारातील अस्तित्वाच्या घटका मोजत असलेल्या यशवंत कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सहकार विभागाने चालू केली आहे.या तालुक्यातील सहकारी संस्थांच्या अस्तित्व व अस्मितीतेच्या मुद्दावर राष्ट्रवादीच्या बंडखोर पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीपासून फारकत घेऊन भाजपशी हातमिळवणी करुन या संस्था तालुक्याच्या अधिपत्याखाली ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
या प्रयत्नाचा भाग म्हणून बाजार समितीच्या १९ वर्षानंतरच्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ बड्या नेत्याचा विरोध पत्करुन तालुक्यात आघाडी पॅटर्नचा फार्म्युला यशस्वी झाला आहे. आता हाच फार्म्युला आगामी यशवंत कारखाना , जिल्हा परिषद व विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी पुढे उभा ठेपणार असल्याने या बंडखोरांच्या कारवायांनी राष्ट्रवादी ला भविष्यात मोठी अडचणीची ठरणार असल्याची धोक्याची घंटा वाजू लागली आहे.
हवेली तालुक्यात बाजार समिती व यशवंत कारखाना या संस्थांच्या अस्तित्वावरुन राष्ट्रवादीत मागील काळात छुपी खदखद सुरू असल्याचे पहायला मिळाले आहे. तालुक्यातील या संस्थांना पक्षाने सत्तेच्या काळात मदत न केल्याची खदखद काही पदाधिकारी खुलेआम व्यक्त करीत आहे. हीच खदखद आता १९ वर्षांनंतर झालेल्या निवडणूकीत पक्षाच्या बंडखोरांनी उचलून धरीत पक्षापासून सवतासुभा घेत पक्ष नेतृत्वाच्या सूचना व आदेशाला धुडकावीत त्यांनी भाजपशी हात मिळवणी करीत राज्यातील सत्तेचा उपयोग करुन घेतला आहे.
त्यामुळे बंडखोर नेत्यांच्या आघाडीचा पॅटर्नला तालुक्यात राष्ट्रवादीची निष्ठावंत मंडळींच्या उरावर वार करणार असल्याने पक्ष त्यातून बोध घेतो ना तोच निवडणूकीचा गुलाल खांद्यावरून न उतरताच बड्या नेत्याने बाजार समितीच्या निवडणूकीत आपल्या विचारांचे हे संचालक असल्याचे सांगून निष्ठावंतांची पुरती पंचायत केली आहे.आधीच या नेतृत्वाने पक्षाने पॅनेल टाकून मदत न केल्याची भावना निष्ठावंतांत असताना बंडखोरांना पाठिशी घालण्याच्या कृतीने हवेलीत किती बंडखोर उदयास येणार म्हणून चर्चेला सुरुवात झाली आहे.
राष्ट्रवादी ने पराभवाची कारणे शोधलीच नाही ?
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीत निष्ठेच्या मुद्दावर लढलेल्या राष्ट्रवादीने पॅनेलचा झालेल्या पराभवाची साधी कारणे शोधण्याचा प्रयत्न केला नसल्याची स्थिती आहे. पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून झालेल्या बंडखोरीतून पक्षाच्या उमेदवाराचा झालेला पराभव , पॅनेलच्या जुळवणूकीत असणाऱ्या नेत्यांच्या सोसायट्यांत न झालेले मतदान या निकालाची कारणे वरिष्ठापर्यंत पोहचविण्याचा न झालेल्या प्रयत्नांचा पक्ष कारवाई सोडा, विचार करणार आहे की नाही ?असा प्रश्न विचारला जात आहे.