लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार? ईकेवायसीची मुदत वाढणार? महत्वाची माहिती आली समोर…


पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी सरकारकडून बंधनकारक करण्यात आलेल्या ई-केवायसी प्रक्रियेची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 आहे.

मात्र अजूनही लाखो महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्याने ही मुदत वाढवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यभरात या योजनेत कोट्यवधी महिलांची नोंदणी झाली असून, प्रशासनाकडून युद्धपातळीवर ई-केवायसी पूर्ण करून घेण्याचे काम सुरू आहे. तांत्रिक अडचणी, नेटवर्क समस्या आणि ग्रामीण भागातील मर्यादा लक्षात घेता सरकार महिलांना अतिरिक्त वेळ देऊ शकते, अशी चर्चा सध्या जोर धरत आहे.

       

दरम्यान, योजनेच्या नियमानुसार ज्या लाभार्थी महिलांची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही, त्यांची नावे लाभार्थी यादीतून वगळली जाऊ शकतात. अशा परिस्थितीत संबंधित महिलांना योजनेचा आर्थिक लाभ थांबण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक महिलांमध्ये चिंता निर्माण झाली असून, प्रशासनावर मुदतवाढीचा दबाव वाढताना दिसतो आहे.

महिला व बालविकास विभागाकडून फसवणूक रोखण्यासाठी तब्बल 2.4 कोटी नोंदणीकृत महिलांची ई-केवायसी पडताळणी सुरू आहे. मात्र 40 लाखांहून अधिक महिलांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत मोठ्या संख्येने ई-केवायसी अपूर्ण राहिल्यास अंतिम मुदत वाढवली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यात येत्या काळात महानगरपालिका निवडणुका होणार असल्याने या निर्णयाला राजकीय किनाराही असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचा निधी रोखल्यास त्याचे राजकीय परिणाम होऊ शकतात, असे मत वरिष्ठ नेत्यांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, ई-केवायसी मुदतवाढीबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे ज्या महिलांची ई-केवायसी अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांनी 31 डिसेंबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!