पुणेकरांनो, ट्रॅफिक जॅममधून आता लवकरच होणार सुटका, रिंगरोडच्या कामाचा ‘टॉप गिअर’; मोठी माहिती आली समोर…

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करणाऱ्या महत्त्वाकांक्षी रिंगरोड प्रकल्पाबाबत एक महत्वाची माहिती आता समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाच्या पश्चिम टप्प्याचे काम आता गती घेत असून आतापर्यंत २० टक्के काम पूर्ण झाले आहे.
येत्या दोन वर्षांत म्हणजेच डिसेंबर २०२७ पर्यंत पश्चिम टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. पुणे बाह्य रिंगरोडचे काम पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात विभागले गेले आहे.
पावसाळा संपल्याने कामाचा वेग वाढवण्यात आला असून, मे महिन्यापर्यंत प्रमुख टप्पे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पश्चिम टप्पा डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होण्याचे संकेत आहेत. तर, पूर्व टप्प्याचे काम पूर्ण होण्यासाठी मे २०२८ पर्यंतचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

नव्या निविदा आणि बदललेले नियोजन: रिंगरोडच्या एकूण लांबीपैकी ३१ किलोमीटरच्या कामासाठी महामंडळाने नव्याने निविदा प्रक्रिया राबवली आहे. यापूर्वी नगर रस्ता ते सोलापूर रस्ता आणि पुढे पुणे-बेंगळुरू हायवेला जोडणाऱ्या या ३१ किमीच्या पट्ट्याचे काम नॅशनल हायवे अथॉरिटी करणार होती.

मात्र, आता हे काम पुन्हा ‘एमएसआरडीसी’च करणार असल्याचे निश्चित झाले आहे. या ३१ किमीच्या पट्ट्याचे काम लवकरच प्रत्यक्ष सुरू होणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दिली. संपूर्ण रिंगरोडचे नियंत्रण महामंडळाकडेच राहून २०२८ पर्यंत संपूर्ण रिंगरोड वाहतुकीसाठी सज्ज करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
