वक्फ विधेयकाला आता न्यायालयात आव्हान देणार! ऑल इंडिया मुस्लिम बोर्डाचा निर्णय..

नवी दिल्ली : वक्फ (दुरुस्ती) विधेयक हा एक काळा कायदा आहे. हे विधेयक कनिष्ठ सभागृहाने मंजूर केला तर ते राज्यसभेत मांडले जाईल. आमची मालमत्ता हिसकावून घेण्यासाठी सुरु केलेला हा प्रयत्न आहे.
हे स्वीकारता येईल का?, असा सवाल करत आम्ही पराभूत झालो आहोत असे समजू नका, आम्ही या विधेयकाला न्यायालयात आव्हान देणार आहोत, अशी माहिती ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) चे प्रवक्ते डॉ. सय्यद कासिम रसूल इलियास यांनी दिली आहे. आज (ता. २) ही माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) मध्ये चर्चेदरम्यान या विधेयकाला विरोध करण्यात आला होता. आपण लढाई हरलो आहोत असे गृहीत धरू नये. आपण नुकतीच सुरुवात केली आहे. हा देश वाचवण्याचा लढा आहे.
प्रस्तावित कायदा भारताच्या रचनेलाच धोका निर्माण करतो. सर्व जागरूक नागरिकांना विधेयकाला विरोध करण्याचे आवाहन करत आम्ही न्यायालयात जाऊ. हा कायदा मागे घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार एआयएमपीएलबीचे एमडी अदीब यांनी व्यक्त केला.
आम्हाला देश वाचवायचा आहे म्हणून आम्ही हा लढा सुरू केला आहे. आम्ही शेतकऱ्यांप्रमाणेच देशभर आंदोलन करुन गरज पडल्यास रास्ता रोको करु आणि विधेयकाला विरोध करण्यासाठी सर्व शांततापूर्ण उपाययोजना करू, असे सांगत शेतकऱ्यांच्या आंदोलनाप्रमाणे देशव्यापी निदर्शने करण्याचा इशाराही एआयएमपीएलबीचे प्रवक्ते मोहम्मद अली मोहसीन यांनी दिले आहे.