नांदणी मठाची ‘माधुरी’ परत येणार? दोन लाखांहून अधिक नागरिकांनी ‘या’ कारणास्तव केल्या स्वाक्षऱ्या, नेमकं प्रकरण काय?

गेल्या अनेक दिवसांपासून महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला कोल्हापूरातल्या मठात ठेवण्यासाठी लोकभावनेतून मागणी होत आहे. स्थानिकांनी हत्तीण परत यावी म्हणून आक्रमक भूमिका घेतली. स्वाक्षरी मोहीम सुद्धा झाली.

आता या हत्तीणीसाठी थेट वनताराचे सीईओ विहान यांनी कोल्हापूर गाठले आहे. कोल्हापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयात वनताराच्या सीईओ सोबत बैठक पार पडली आहे. नांदणी मठातील लाडकी महादेवी ऊर्फ माधुरी हत्तीण गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात पाठवण्यात आल्यानंतर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात संतापाचं वातावरण आहे.
दरम्यान, या हत्तीणीला परत मठात आणण्यासाठी सुरू झालेल्या ‘मिशन माधुरी’ मोहिमेला प्रचंड जनसमर्थन लाभत आहे. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या सह्यांच्या मोहिमेत २ लाख ४ हजार ४२१ नागरिकांनी स्वाक्षरी करून आपली भावना व्यक्त केली आहे.

ही सर्व स्वाक्षरी असलेले फॉर्म राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. कोल्हापूरच्या रमणमळा पोस्ट ऑफिस येथून हे अर्ज राष्ट्रपती भवनाला पाठवले जातील. मठ परिसरात पारंपरिक विधीपूर्वक पूजन करून ही प्रक्रिया पार पडली.
‘महादेवी’ हत्तीणीला नांदणी मठातून दूर केल्यापासून ग्रामस्थ, भाविक, कार्यकर्ते आणि नेते एकत्र आले आहेत. स्वप्नील राजशेखर यांच्यापासून ते अनेक स्थानिक कार्यकर्त्यांपर्यंत साऱ्यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत हत्तीणीच्या पुनरागमनाची मागणी केली आहे.
आता त्याच भावना सह्यांचं रूप घेऊन राष्ट्रपतींपर्यंत पोहोचणार आहेत. या मोहिमेच्या पूजन सोहळ्यात माजी आमदार ऋतुराज पाटील, गणपतराव पाटील, आप्पासाहेब लठ्ठे, शशिकांत खोत, विजय चौगले यांच्यासह अनेक मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ‘जिओ बॅन’ आणि सिम पोर्टिंग मोहीम राबवली जात असून त्याचा परिणाम प्रशासनावर स्पष्टपणे जाणवत आहे. दरम्यान, वनतारा संस्थेचे सीईओ कोल्हापुरात दाखल झाले असून त्यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी, व मठाधिपतींसोबत चर्चा केली.