सोनं 3 लाखांच्या पार जाणार? अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?, जाणून घ्या…

नवी दिल्ली : सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि मार्केट रणनीतीकार एड यार्डेनी यांनी सोन्याच्या दराबाबत मोठा अंदाज वर्तवला आहे.
त्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर या दशकाच्या अखेरीस तब्बल 10 हजार डॉलर प्रति औंसपर्यंत जाऊ शकतो, ज्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावरही होणार आहे. यार्डेनी रिसर्चचे अध्यक्ष एड यार्डेनी यांनी ‘Roaring 2020s’ या संकल्पनेच्या आधारे हा अंदाज व्यक्त केला आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 4400 डॉलर प्रति औंसच्या आसपास असून, भविष्यातील व्याजदर कपातीच्या अपेक्षांमुळे सोन्यात मोठी तेजी येऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या न्यूयॉर्कमधील कॉमेक्स बाजारात सोन्याचा दर सुमारे 4410 डॉलर प्रति औंस इतका आहे. जर यार्डेनी यांचा अंदाज खरा ठरला आणि सोन्याचा दर 10 हजार डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचला, तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत सुमारे 127 टक्क्यांची वाढ होऊ शकते. म्हणजेच, सोन्याचा दर अडीच पट वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भारतीय बाजाराचा विचार केल्यास, एमसीएक्सवर सध्या सोन्याचा दर 1,35,890 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास आहे. यामध्ये 127 टक्क्यांची वाढ झाली, तर 2029 पर्यंत सोन्याचा दर थेट 3.08 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे ‘सोने 3 लाखांचा टप्पा पार करणार’ ही शक्यता नाकारता येत नाही.
आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली. सोन्याच्या दरात 1805 रुपयांची वाढ झाली असून, 24 कॅरेट सोन्याचा दर 1,37,591 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. 2025 या वर्षात आतापर्यंत सोन्याच्या दरात एकूण 57,884 रुपयांची वाढ झाली आहे.
चांदीच्या दरातही जोरदार उसळी पाहायला मिळाली आहे. आज चांदीच्या दरात तब्बल 7214 रुपयांची वाढ झाली असून, जीएसटीसह एक किलो चांदीचा दर 2,13,776 रुपयांवर पोहोचला आहे. 2025 मध्ये आतापर्यंत चांदीच्या दरात एकूण 1,21,533 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
