‘बिग बॉस मराठी ६’च्या घरात गौतमी पाटील दिसणार? स्वत:च केला मोठा खुलासा, म्हणाली…

पुणे : महाराष्ट्रातील तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेली अदाकारा, नृत्यांगणा गौतमी पाटील हिला न ओळखणारं सध्या तरी कुणीच नाही. गौतमीचा कार्यक्रम कुठेही असो, तिथे गर्दी होणारच. ती स्टेजवर आली की, आपल्या अदांनी सर्वांना घायाळ करते.

लाइव्ह शो, सिनेमातले आयटम नंबर्स, रिॲलिटी शो, म्युझिक अल्बमध्येही ती झळकत आहे. अशातच महाराष्ट्राची सेन्सेशन असलेली सबसे कातील गौतमी पाटील आता ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वात दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. ‘

बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनवेळीही अशीच चर्चा रंगलेली. त्यावेळी गौतमीनं सर्व चर्चा फेटाळून लावलेल्या पण, ‘बिग बॉस मराठी’च्या आगामी सीझनमध्ये झळकणार का? यावर गौतमीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उत्तर दिलं आहे.

तर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतगौतमीनं बिग बॉससंदर्भातल्या प्रश्नावर उत्तरं दिली. तेव्हा तिनं एक खुलासा केला की, तिला बिग बॉसच्या पाचव्या पर्वासाठीही विचारणा झाली होती. ‘बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनवेळी देखील मला ऑफर आली होती, पण मी ती नाकारली.
कारण मी तीन-चार दिवसांपेक्षा जास्त वेळ आईला सोडून राहूच शकत नाही, असं गौतमी म्हणाली आहे. मी ३ ते ४ दिवस आईशिवाय राहते, पण त्याच्यानंतर मला तिला सोडून राहणं शक्य होत नाही…आई हेच माझे पहिलं प्राधान्य असल्याचंही तिनं सांगितले आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ६’चा नवा प्रोमो कलर्स मराठीकडून प्रदर्शित करण्यात आला आहे. ११ जानेवारीपासून ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन सुरू होणार आहे. पण, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यंदा कोण झळकणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
अशातच गौतमी पाटील ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वात सहभागी होणार असल्याचं बोललं जात होतं, पण आता स्वतः गौतमीनं यावर स्पष्टीकरण दिल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
