येत्या दोन महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार?’ या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ

पुणे:आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना महायुतीतील अंतर्गत वाद गेल्या काही दिवसांपासून चव्हाट्यावर आला होता. अनेक जण भाजपात प्रवेश करत होते. याचा जास्त फटका शिवसेना शिंदे गटाला बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठं भाकीत वर्तवलं आहे. शिंदे पुढील एक ते दोन महिन्यात मुख्यमंत्री होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी पुन्हा स्वतःची पावर काय आहे हे दाखवून दिलं आहे, येणाऱ्या राज्यातल्या महापालिका आम्ही वेगळे लढणार अस भाजपा सांगत होती, पण आता त्यांना माघार घ्यावी लागणार आहे. युती करून लढू असं ते आता म्हणत आहेत. एकनाथ शिंदे हे अमित शाह यांना भेटले, एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांना खिशात घातलं आहे, ही त्यांची किमया आहे. त्यामुळे आता सर्व महापालिकांच्या निवडणुका शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकत्र लढणार आहेत.
याआधी विधानसभेची निवडणूक झाली आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं नाही, त्याचा हा बदला असावा असं त्यावरून दिसत आहे, एकनाथ शिंदे येत्या महिना दोन महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वाटत आहे, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, शरद पवार हे चाणक्य आहेत. काही काळापूर्वी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली होती, यातून एकनाथ शिंदे यांनी योग्य संदेश दिला आहे. मला तरी यातून हेच दिसत आहे, अमित शाह यांच्या सारख्या माणसाला शिंदे यांनी शिखात घातलं आहे, असं यावेळी त्यांनी म्हटलं. त्यामुळे आगामी काळात काय होणार हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे.

