मोठा ट्विस्ट… भाजप उद्धव ठाकरेंसोबत जाणार? राज्यात महापौरपदासाठी मोठ्या खेळी काय?


मुंबई : राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुका अलिकडेच पार पडल्या असून त्याचे निकाल हाती आले आहेत. भाजपने या निवडणुकीत घवघवीत यश मिळवले आहे. निकालानंतर आता महापौर कोण होणार याची चर्चा सुरू आहे.

काही महापालिकांच्या निकालामुळे पेच निर्माण झाला आहे. युती आणि आघाडी करून हा पेच सोडवणे गरजेचे आहे. राज्यातील वेगवेगळ्या महापालिकांमधील चित्र पाहता, भाजप आणि उद्धव ठाकरेंची युती होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत असून, भाजप, शिवसेना (ठाकरे गट), शिंदे गट, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या समीकरणांची चर्चा सुरू आहे.

काही ठिकाणी परंपरागत विरोधी पक्षही एकत्र येण्याची चिन्हे दिसत असून, सत्तेसाठी कोण कोणासोबत जाणार याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार तर्कवितर्क सुरू आहेत. यामुळे महापौरपदाची लढत अधिकच रंजक बनली असून, आगामी काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात युती होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून जो आमचा महापौर करेल त्याच्यासोबत जाण्यास आम्ही तयार आहोत, असे संकेत देण्यात आले असून, यामुळे काँग्रेसवर दबाव वाढला आहे.

भाजपने ठाकरे गटाला महापौरपद देऊन सत्ता स्थापन करण्याचा पर्याय तपासण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. असे झाल्यास काँग्रेसच्या हातातोंडाशी आलेली सत्ता घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अनपेक्षित घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे आकाराला येत असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, भाजप आणि ठाकरे गट यांच्यातील संभाव्य जवळीक ही सध्याच्या राजकीय स्थितीतील सर्वात मोठी चर्चा ठरत आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत युती होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडे 34 तर शिंदे गटाकडे 15 नगरसेवक असल्याने दोन्ही पक्ष एकत्र आल्यास सत्ता स्थापन करणे शक्य आहे. यासाठी दोन्ही बाजूंमध्ये बैठकांना वेग आला असून, पडद्यामागे महत्त्वाच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, याशिवाय उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांनी शिंदे गटाला अधिकृत पाठिंबा दिल्याने शिवसेनेचे संख्याबळ वाढले आहे. त्यामुळे येथे शिंदे गटाचा महापौर होण्याची शक्यता बळावली असून, उपमहापौरपद वंचितला मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!