पत्नीला संपवलं, मुलाला मृतदेहाशेजारी…; भाजप नेत्याच्या क्रूर कृत्याने उडाली खळबळ

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने घरगुती वादातून पत्नीची हत्या केली. यानंतर त्याने आपल्या तीन वर्षांच्या मुलाला आईच्या मृतदेहाशेजारी कोंडून पळ काढला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, ही भयंकर घटना मौदाहा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात घडली. आरोपी मुईनुद्दीन आणि त्याची पत्नी रोशनी (वय २४) यांच्यात शनिवारी रात्री कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात मुईनुद्दीनने लोखंडी रॉडने रोशनीवर हल्ला केला.

या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपीने आपल्या तीन वर्षांच्या मुलाला, असदला, रक्ताने माखलेल्या मृतदेहाजवळ सोडून खोलीला बाहेरून कुलूप लावले आणि पळ काढला.

रविवारी सकाळी शेजाऱ्यांना खोलीतून मुलाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी नातेवाईकांना (युसूफ अली, कमरुद्दीन) कळवले, ज्यांनी पोलिसांना बोलावले. पोलीस स्टेशन प्रभारी उमेश यादव आणि सीओ राजेश कमल यांनी दरवाजा तोडला, तेव्हा आतील दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला.
तीन वर्षांचा असद आईच्या मृतदेहाजवळ बसून रडत होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून फॉरेन्सिक टीमला पाचारण केले. रोशनीची आई इशरत बानो यांनी जावयाविरुद्ध तक्रार दाखल केली.
