दारू कशाला पिता? पत्नीनं विचारलं अन् पतीनं थेट चाकूच उपसला, पुण्यात धक्कादायक घटना


पुणे : सकाळीच मद्यप्राशन केल्याचा जाब विचारणाऱ्या पत्नीवर पतीने घरातच चाकूने सपासप वार करून तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संतापजनक घटना पिंपरी-चिंचवडमधील जाधववाडी परिसरातून समोर आली आहे.

या प्रकरणी चिखली पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. ही घटना जाधववाडीतील पंतनगर येथे घडली.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी दीपक लक्ष्मण भोगल (मूळ रा. बीड) हा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मद्यप्राशन करत होता. घटनेच्या दिवशी त्याने सकाळीच मद्यप्राशन केलं होतं. आपल्या संसाराची होणारी ओढाताण पाहून पत्नीने त्याला सकाळीच दारू का पिता? असा प्रश्न विचारून जाब विचारला.

ही साधी विचारणा आरोपीला इतकी झोंबली की त्याने घरात राडा घालण्यास सुरुवात केली. मद्याच्या नशेत असलेल्या दीपकने पत्नीला अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. पत्नीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, रागाच्या भरात त्याने घरातील चाकू उचलला आणि पत्नीवर सपासप वार केले.

या हल्ल्यात पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली. जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पीडित महिलेच्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी दीपक भोगल याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!