बारामतीच नशीब कोण आजमावणार? सुनेत्रा पवारांविरुद्ध 9 बारामतीकर रिंगणात, मुंबई -ठाण्याचे पाहुणेही मैदानात…

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत त्यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्या विरोधात आता नऊ बारामतीकर उभे ठाकले आहेत. तर 13 बाहेरील उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.

राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचे चित्र काल (गुरुवारी) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले. शेवटच्या दिवशी 30 उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता 23 उमेदवार शिल्लक राहिले आहेत.या उमेदवारांपैकी केवळ 10 उमेदवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातील रहिवासी आहेत. तर अन्य उर्वरित 13 उमेदवार उल्हासनगर, सोलापूर, अंबरनाथ, कल्याण आणि पुणे अशा राज्याच्या विविध भागांतून बारामतीत नशीब आजमावण्यासाठी आले आहेत.
राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी उपमुख्यमंत्री सु्नेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार दिला नाही. काँग्रेसच्या उमेदवारानेही आपला अर्ज मागे घेतला.या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मैदानात असलेल्या एकूण उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवार हे बारामती मतदारसंघाच्या बाहेरील आहेत. त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्यासमोर अपक्ष उमेदवारांचे आव्हान असणार आहे.
विशेषतः स्थानिक विरुद्ध बाहेरचे असे समीकरण या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यातील लोकसभा, विधानसभा अशा अनेक निवडणुका लढवलेले अभिजीत बिचुकले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा मुंडे याही बारामतीत नशीब आजमावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहे.
