जनतेचा कौल कोणाला? पुण्याच्या पहिल्या निकालाबाबत महापालिकेच्या निवडणूक उपायुक्तांची घोषणा

पुणे: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून मतमोजणीच्या नियोजनाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे महापालिकेच्या निकालाबाबत निवडणूक उपायुक्तांनीं घोषणा केली आहे.सकाळच्या सत्रात साधारण 11.30 वाजेच्या सुमारास पहिला निकाल हाती येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडल्यानंतर 16 जानेवारी रोजी मतमोजणीला सुरुवात होणार आहे.एकूण 41 प्रभागांमधून 165 नगरसेवक निवडून दिले जाणार असून, यामध्ये 40 प्रभाग हे चार सदस्यीय आहेत. निवडणूक उपायुक्त प्रसाद काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका फेरीसाठी साधारण 30 मिनिटांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात साधारण 11.30 वाजेच्या सुमारास पहिला निकाल हाती येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान शहराच्या विविध भागांतील प्रभागांची रचना आणि तेथील सदस्यांची संख्या लक्षात घेता, काही ठिकाणी निकालाची प्रक्रिया अत्यंत वेगाने पार पडणार आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रभागांच्या संख्येनुसार मतमोजणीच्या फेऱ्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून दुपारपर्यंत म्हणजेच साधारण ३.३० ते ४.०० वाजेपर्यंत संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईल, असेही काटकर यांनी स्पष्ट केले आहे.

मतमोजणीची प्रक्रिया पार पडल्यानंतर या महानगरपालिका निवडणुकीसाठी जनता कौल कोणाला देणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
