मुंबईचा महापौर कुणाचा होणार? शपथविधी कधी होणार? भाजपच्या बड्या नेत्यानं सगळंच सांगून टाकलं..


मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून सध्या जोरदार राजकीय रस्सीखेच सुरू आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या शिवसेना शिंदे गटानेही महापौर पदावर दावा सांगितला आहे.

त्यामुळे महायुतीतील मित्रपक्षांमध्येच चर्चांना वेग आला असून मुंबईचा महापौर कुणाचा होणार, याकडे राज्यभराचं लक्ष लागलं आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला बहुमत मिळालं असलं तरी एकनाथ शिंदेंनी अडीच वर्षे महापौर पद आपल्याला द्यावं, अशी मागणी केली आहे.

यामुळे महापौर पदावरून पेच निर्माण झाला आहे. भाजपवर दबाव आणण्यासाठी एकनाथ शिंदेंनी हॉटेल पॉलिटीक्स करण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्व नगरसेवकांना मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवलं.

पण एकनाथ शिंदे यांच्या दबावतंत्राला फारसं यश मिळालं नसल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचाच महापौर होणार असल्याचं आता कन्फर्म झाल्याची माहिती आहे. शिवाय मुंबईचा महापौर शपथ कधी घेणार? याची माहिती देखील समोर आली आहे. भाजपच्या एका बड्या नेत्यानं दिल्लीतील अनौपचारिक गप्पांमध्ये याबाबतचा खुलासा केला आहे.

आज मंगळवारी शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांमध्ये प्राथमिक बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते सहभागी होणार असून बीएमसी निकालानंतरची ही पहिली औपचारिक चर्चा मानली जात आहे. महापौर पदासह आगामी सत्तासमीकरणांवर यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणूक जिंकणाऱ्या नगरसेवकांसाठी २० जानेवारी रोजी गॅझेट नोटिफिकेशन जाहीर होणार आहे. त्यानंतर २१ आणि २२ जानेवारी रोजी गट म्हणून नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत २२ जानेवारी रोजी लॉटरी पद्धतीने काढली जाणार आहे.

त्यानंतर ३१ जानेवारी रोजी महापौर निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्ष मतदानापूर्वीच महापौर कोणत्या पक्षाचा असेल, याचा निर्णय महायुतीत होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर या घडामोडींना अधिक वेग येईल, असे संकेत मिळत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!