कोण ठरणार सर्वश्रेष्ठ ! भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या अंतिम सामन्याकडे करोडो भारतीयांसह जगभराच्या नजरा ..!!

अहमदाबाद : अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या ‘विश्वचषक चषक-२०२३’ च्या अंतिम सामन्यात विश्वचषकावर
कोण नाव कोरणार ? म्हणून उत्कंठा शिगेला पोहचली आहे. एका बाजूला स्पर्धेत कमालीच्या सातत्याने कामगिरी दाखविणारा भारतीय क्रिकेट संघ आणि दुसरीकडे चिवट प्रतिकारासाठी प्रसिद्ध असणारा ऑस्ट्रेलिया संघ अशी झुंज रविवारी रंगणार असल्याने भारतीय संघ मायदेशात तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्यात यशस्वी व्हावा म्हणून संपूर्ण देशात प्रार्थना , पुजा अर्चांनी साकडे घातले जात आहे.
विश्वचषकातील भारतीय संघाची आतापर्यंतची कामगिरी लक्षात घेता भारतीय संघच विजेतेपदावर शिक्कामोर्तब करणार असा विश्वास वाटतो. पण, ऑस्ट्रेलियाचा चिवटपणा विसरता येणार नाही. दोन पराभव, विजयासाठी तीन वेळा अखेरच्या षटकापर्यंत झुंजावे लागल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघच नाही, तर प्रत्येक खेळाडू तावून सुलाखून बाहेर पडला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचा हा चिवटपणा अंतिम सामन्यात भारतीय सातत्यांसमोर आव्हान म्हणून उभा राहिल्यास आश्चर्य वाटणार नाही.केवळ चाहतेच नाही, तर स्पर्धेचा प्रत्येक भागीदार, प्रायोजक अशा प्रत्येकांना भारताने जिंकावे असेच वाटत आहे.
नरेंद्र मोदी मैदानावर उपस्थित राहणाऱ्या तब्बल लाखभर प्रेक्षकांच्या प्रत्येकाच्या तोंडूत भारताच्या नावाचा गजर होणार आहे. हा गजर केवळ गुजरातमध्येच नाही, तर गुजरात पासून देशाच्या कानाकोपऱ्याबरोबर अवघ्या जगात ऐकू जाणार आहे. प्रेक्षकांमधून उमटणाऱ्या प्रत्येक शब्दाने अंगावर रोमांच उभे राहणार आहेत आणि खेळाडूंच्या शरीरावर मूठभर मांस अधिकच वाढणार आहे. पण, केवळ मूठभर मांस वाढून चालणार नाहीये, मैदानावर ते प्रत्यक्षात उतरायला हवे, तरच महा रविवाराचे स्वप्न साकार होणार आहे. विश्वचषक स्पर्धेचा इतिहास साक्षी आहे की सलग विजय मिळवणारा संघ कधीही विजेतेपद मिळवू शकलेला नाही. गेल्या वर्षी अगदी इंग्लंडलाही पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळेच सलग अकरावा सामना जिंकून रोहित शर्मा आणि त्यांच्या शिलेदारांना हा इतिहास बदलण्याची संधी आहे.
विराट कोहली (७११) आणि कर्णधार रोहित शर्मा (५५०) या स्पर्धेत भारताचे रन मशीन ठरले आहेत. शुभमन गिल सलामीला कमालीच्या विश्वासाने खेळत आहे. श्रेयस अय्यर, लोकेश राहुल हे देखिल आपापल्या परीने योगदान देऊन गेले आहेत.गोलंदाजीतही म्हणाल, तर निश्चितच आजपर्यंतचा सर्वोत्तम गोलंदाजांचा ताफा भारतीय संघाच्या दिमतीला उभा आहे. जसप्रित बुमरा, कुलदीप यादव, महंमद सिराज, रवींद्र जडेजा असे चार प्रमुख गोलंदाज असले, तरी महंदम शमी यंदाच्या स्पर्धेत आपली सर्वोत्तम कामगिरी करून दाखवत आहे. भारतीय फलंदाजांचा धसका प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी कितीही घेतला असला, तरी भारतीय गोलंदाजांनी निर्माण केलेला दरारा कधी विसरता येत नाही. हा गोलंदाजांचा दरार उद्या भारताच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिल्यास, भारताला रोखणे ऑस्ट्रेलियाला जड जाणार आहे.
दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघ आपल्या चिवटपणासाठी प्रसिद्ध असून, विजेतेपदाचा षटकार लगावतानाही ते हा चिवटपणा सोडणार नाहीत. पहिल्या दोन सामन्यात झालेला पराभव आणि नंतर अगदी उपांत्य फेरीतसुद्धा सहन करावा लागलेला संघर्ष यामुळे त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजी परिक्षेतून उत्तीर्ण होऊन आली आहे. परिस्थितीनुसार कसा खेळ करायचा हे ऑस्ट्रेलियाचा प्रत्येक खेळाडू जाणतो. त्यामुळे हीच ऑस्ट्रेलियाची खरी ताकद राहबणार आहे. डेव्हिड वॉर्नर, ट्राविस हेड, मिशेल मार्श, मार्नस लाबुशेन, स्टिव्ह स्मिथ, इंग्लिस असे फलंदाज ऑस्ट्रेलिया संघात आहेत. मिशेल स्टार्क, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स अशी वेगवान गेलंदाजांची ताकद राहिल. स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करण्याच्या स्पर्धेत आघाडीर राहिलेला अॅडम झम्पा यालाही विसरून चालणार नाही. उपखंडातील खेळपट्ट्यांची क्षमता परदेशातील गोलंदाजांपैकी झम्पाने चांगली ओळखली आहे. अगदी ऐनवेळी संधी मिळाल्यावर ट्राविस हेडही धावून आला आहे. त्यामुळे संघातील प्रत्येक खेळाडूंना केवळ विजेतेपदाने झपाटले आहे.
नरेंद्र मोदी मैदानावर हे संघाचे कागदावरील बलाबल महत्वाचे ठरणार नाहीये, तर मैदानावरील कामगिरीला महत्वाची ठरणार नाही. एकीकडे सातत्याचे दुसरे नाव ठरणारा भारतीय, तर दुसरीकडे चिकाटी बरोबर ऑस्ट्रेलिया असे समीकरण तयार झाले आहे. दोन्ही संघ आपपल्या परीने सर्वोत्तम आहेत. पण, विजेतेपदाची माळ एकाच संघाच्या गळ्यात पडणार आहे. आता ती माळ कोणाच्या पदरात पडणार हे पाहण्यासाठी विश्वचषकाचे अखेरचे २४ तास तरी वाचट पहावी लागेल.