वैष्णवीचा मृत्यू झाला तेव्हा घरात कोण होतं? वकिलाच्या गौप्यस्फोटाने उडाली खळबळ, नेमकं काय म्हणाले?

पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या मृत्यूच्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. हुंड्यासाठी छळ झाल्याचा आरोप करत पोलिसांनी तिच्या सासरच्या पाच नातलगांना अटक केली आहे. याबाबत तपास सुरू असताना अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. आता हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी एक वेगळा दावा केला आहे.

या नवीन दाव्यामुळे प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. १६ मे ला वैष्णवीचा मृत्यू झाला तेव्हा तिचा पती, सासू, सासरे, दीर आणि नणंद हे पाचही जण घरात नव्हते. यामुळे या प्रकरणात उपस्थितीच्या वेळेवरून संशय निर्माण झाला आहे. यामुळे याबाबत वेगळ्या अंगाने तपास केला जाणार आहे.
तसेच वकिलाने सांगितले की, वैष्णवीचं एका अज्ञात व्यक्तीसोबत चॅटिंग सुरू होतं आणि त्या व्यक्तीसोबतचे संबंध नकोसे होते. आता हा अनोळखी व्यक्ती कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याची ओळख पटवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून तपास सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, संपलेल्या पोलीस कोठडीनंतर आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं. न्यायालयाने पती, सासू आणि नणंद यांची कोठडी एका दिवसाने, तर सासरे आणि दीर यांची कोठडी ३१ मेपर्यंत वाढवली आहे. पोलीस याबाबत कसून चौकशी करत आहेत. याबाबत अनेकांनी वेगवेगळे दावे केले जात आहेत.
पोलिसांनी नणंदेचा मोबाईल मिळवण्यासाठी ही कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. वैष्णवीची नणंद करिश्मा हिचा मोबाईल अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही, त्यामुळे तपासात अडथळा येतो आहे. यामध्ये अनेक पुरावे असल्याचे सांगितले जात आहे.