हत्येचा कट कोणी रचला? मनोज जरांगेनी ‘त्या’ व्यक्तीवर केला गंभीर आरोप…

पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कट प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे. जरांगे यांच्या हत्येचा कट कुणी रचला? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना यावर आता मनोज जरांगेंनी गंभीर आरोप केला आहे. एका नीच वृत्तीने हा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे ती व्यक्ती कोण असणार याचा उलगडा आता केला जात आहे.

पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, ‘या प्रकरणात काय गंभीर खुलासे झाले, मला माहीत नाही. तो तपास आणि चौकशीचा भाग आहे. जालना जिल्ह्याचे आमचे एसपी साहेब यात लक्ष घालून आहे. ते खोलापर्यंत जाणार आहे.’मला धमकी देणारा जन्माला येऊ शकत नाही. पण हे सत्य आहे की, खूप मोठा षड्यंत्र रचलं गेलं. एका नीच वृत्तीने हा कट रचलाय. तू जरी नेता असशील, तर चुकीच्या ठिकाणी हात टाकला आहे. घटना खूप गंभीर आहे, करणारा पेक्षा करून घेणारा करून घेणाऱ्यांनी खूप चुकीचं पाऊल उचललं आहे. खूप चुकीच्या ठिकाणी हात घातला आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे जरांगेंच्या हत्येच्या कटात राजकीय व्यक्तीचा हात असल्याची चर्चा आता होत आहे.
दरम्यान जरांगे यांनी समाजाला आवाहन केल आहे की, तुम्ही शांत राहावं. कट करणाऱ्या नेत्याला एक लक्षात ठेव म्हणावं, तू येथून पाठीमागे काय केले, कुणाला कळालं नाही. तुझ्या आयुष्यातली पहिली वेळ असेल की, तू करायचा अगोदर तुझ्या आठवणीला आम्ही भेदलं आहे. आम्ही कच्चे नाही, असेही ते पुढे म्हणाले.
