घायवळचा आका कोण? अनेक प्रकरणात कोणी वाचवलं? धक्कादायक माहिती आली समोर..

पुणे : पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन घायवळ थेट स्वित्झर्लंडला पोहोचला आणि नाचक्की झालेल्या पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती कारवाईचा फास आवळायला सुरुवात केली. निलेश घायवळाच्या कोथरुड परिसरातील घरावर पोलिसांनी छापा टाकला.

या छाप्यात पोलिसांनी अनेक आक्षेपार्ह वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रं जप्त केलीत. छापेमारीदरम्यान घरातून जिवंत काडतुसं, मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पाशी संबंधित फाइल्स, सातबारा, जमीन खरेदीसंबंधी कागदपत्रे आदी पोलिसांच्या ताब्यात आली आहेत. ही माहिती पोलिसांनी पुढील तपासासाठी सुरक्षित ठेवली आहे.

तसेच घायवळ थेट स्वित्झर्लंडला पोहचल्याची बातमी समोर आल्यानंतर विरोधकांनी या कारवाईवर आक्रमक प्रतिक्रिया देत विचारले आहे कि, “घायवळसारख्या गुन्हेगाराला नेमकं कोणी पोसलं?” राजकीय वर्तुळात वावर करणारा घायवळ मुळात मकोकाचा गुन्हा असतानाही परदेशात कसा सहज पळाला? पासपोर्ट जारी करताना पोलिसांकडून खरंच हलगर्जीपणा झाला कि तो केला गेला, असा सवाल अनेक नागरिक विचारत आहेत.

दरम्यान, सामान्य लोकांना त्रास देणाऱ्या अशा गुन्हेगारांना पाठिशी घालण्यामागे नेमकी कोणती शक्ती आहे, हा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. सुप्रिया सुळेंनीही या प्रकरणामागे एखाद्या बड्या व्यक्तीचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
पोलिसांनी आता या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, पुढील कारवाईत अधिक महत्त्वाचे तथ्य समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात जात आहे. निलेश घायवळचा आका नेमका कोण? ही बाब समोर आल्यानंतर अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
