वैष्णवी जीवन संपवण्यापूर्वी कोणाशी बोलली? महत्वाची माहिती आली समोर..

पुणे : पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आता पोलिस तपास अधिक गंभीर स्वरूप धारण करत आहे. १६ मे रोजी सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवीनं गळफास लावून जीवन संपवलं आहे. यानंतर तिच्या पतीसह सासरच्या पाच सदस्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अशातच आता मृत्यूपूर्वी वैष्णवीने निलेश चव्हाणसोबत संवाद साधला होता, असा दावा सरकारी वकिलांनी न्यायालयात केला असून, त्यामुळे आरोपी निलेश चव्हाणला ३ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
सरकारी वकिलांनी सुनावणी दरम्यान स्पष्ट केलं की, निलेश चव्हाण हगवणे किंवा कस्पटे कुटुंबाचा अधिकृत नातेवाईक नसताना त्याच्याकडे वैष्णवीच्या बाळाची जबाबदारी का सोपवण्यात आली? हा अत्यंत संशयास्पद मुद्दा आहे.

तसेच, वैष्णवीच्या आत्महत्येआधी दोघांमध्ये काय संवाद झाला?, याचा तपास आवश्यक आहे. आरोपीकडील मोबाईलमध्ये माहिती डिलीट केली असण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून त्याचा सखोल तपास होणे गरजेचे असल्याचे नमूद करण्यात आले.
दरम्यान, निलेश चव्हाणच्या वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले की, “माझ्या अशिलाचा गुन्ह्याशी थेट काहीही संबंध नाही. फक्त बाळ सांभाळायला दिलं गेलं, इतकाच संबंध होता. मोबाइल जप्त करण्यासाठी पोलीस कोठडी गरजेची नाही. तसेच, त्याच्याकडे असलेलं पिस्तूल कायदेशीर आहे आणि त्याचा कुठेही गैरवापर झालेला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.