चहा ठरलं कारण! पुण्यावरून गोव्याला जात असताना चहावरून झाला वाद, पर्यटकाला हातपाय बांधून बेदम मारहाण, ६ जणांवर गुन्हा दाखल…

पुणे : पुण्यावरून गोव्यासाठी जात असलेल्या पर्यटकाला दोरीने बांधून हॉटेल व्यावसायिकाकडून बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने नंतर एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी ६ ते ६:३० वाजताच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर झाराप झिरो पॉईंटवर घडली

रुपेश बबन सकपाळ (वय-३३, रा. कात्रज, पुणे) असे मारहाण झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.
दरम्यान, याप्रकरणी तनवीर करामत शेख, शराफत अब्बास शेख (वय. ५७), अब्बास उर्फ साहिल शराफत शेख (वय. १८), परवीन शराफत शेख (वय. ४२), साजमीन शराफत शेख (वय. १९), तलाह करामत शेख (वय. २६, सर्व रा. झाराप खान मोहल्ला, ता. कुडाळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, पुणे कात्रज येथील पर्यटक गोव्याला जात होते. गुरुवारी (ता.६) सकाळी सहाच्या सुमारास मुंबई- गोवा महामार्गावर झाराप झिरो पॉईंट येथे एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी हे पर्यटक थांबले. चहा घेताना एका कपात माशी पडली.
त्यामुळे त्यांनी हा चहा बदलून द्या, असे सांगितले. त्यावरून हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली व त्याचे पर्यावसन मारहाणीत झाले. हॉटेल व्यावसायिकांसह अन्य काही जणांनी या पर्यटकाचे हातपाय बांधून त्याला रस्त्यावर झोपविले आणि मारहाण केली.
त्यानंतर पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ पोलिस ठाण्याची टीम घटनास्थळी तत्काळ दाखल झाली. दरम्यान सहा जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.