भयंकर! भांडण सुरू असताना पतीचं झोपेचं सोंग, बायकोची सटकली, उकळता चहाच तोंडावर ओतला, मग… पुण्यातील घटनेने खळबळ


पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात कौटुंबिक वादातून एक धक्कादायक आणि तितकीच अजब घटना समोर आली आहे. पत्नीच्या बोलण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून झोपेचे सोंग घेणे एका पतीला भलतेच महागात पडले. संतापलेल्या पत्नीने थेट गॅसवरचा उकळता चहा पतीच्या तोंडावर ओतल्याने पती गंभीर भाजला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रवी दीपक गागडे (वय २७) हे सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. दोन वर्षांपूर्वी त्यांचा प्रिया गागडे (वय २२) हिच्याशी विवाह झाला होता. मात्र, गेल्या काही काळापासून या दाम्पत्यामध्ये आर्थिक बाबींवरून सातत्याने खटके उडत होते. सोमवारी रात्रीही त्यांच्यात पैशांच्या कारणावरून मोठी बाचाबाची झाली होती.

दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळीही प्रिया याच मुद्द्यावरून वाद घालत होती. पत्नीचे बोलणे ऐकून वाद वाढू नये, या विचाराने रवी यांनी तिच्याकडे लक्ष न देता झोपण्याचे सोंग घेतले. पती आपल्याला दाद देत नाही, हे पाहून प्रियाचा राग अनावर झाला. तिने रागाच्या भरात स्वयंपाकघरातील गॅसवर उकळत असलेला चहा आणून थेट रवी यांच्या चेहऱ्यावर आणि अंगावर ओतला.

दरम्यान, उकळता चहा कपाळावर पडल्याने रवी गंभीररीत्या भाजले गेले. त्यांना तात्काळ उपचारासाठी ससून रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेनंतर रवी गागडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोथरूड पोलिसांनी पत्नी प्रिया विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबिक वादाचे रूपांतर अशा हिंसक कृत्यात झाल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!