धक्कादायक! मैत्रिणीसोबत शाळेत जाताना बळजबरीने गाडीत बसवलं, काही अंतरावर नेत विनयभंग करून पाईपने केली मारहाण, बीड येथील घटनेने खळबळ..

बीड : बीडच्या नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत एका शाळकरी मुलीला पाईपने मारहाण करत विनयभंग केल्याचा प्रकार समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे . या प्रकरणात तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, शुभम बोरखेडे, मधुकर केमकर आणि एका अनोळखी मुलांनी शाळकरी मुलीला बळजबरी उचलून वाहनात बसवले. काही अंतरावर नेत तिचा विनयभंग करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यातील दोघांनी पीडित मुलीला पाईपने मारहाण केली.
दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

बीड शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. नुकताच एका तरुणावर हातात कोयते आणि सत्तुर घेऊन हल्ला करतानाचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून, पुन्हा एकदा बीडमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा बीडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.