जो आमच्या नादी लागणार…; आंदेकर गँगने आयुष कोमकरवर गोळीबार कसा केला?, त्यादिवशी सोबतच असणाऱ्या लहानग्या अर्णवने केला हादरवणारा खुलासा

पुणे : नाना पेठ परिसरात ५ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या टोळीयुद्धातून अवघ्या १९ वर्षांच्या आयुष कोमकरची निर्घृण हत्या झाली. वर्षभरापूर्वी झालेल्या वनराज आंदेकर हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीने गणेश कोमकरच्या मुलगा आणि स्वतःचा नातू असणाऱ्या आयुषला टार्गेट केले, असे तपासात समोर आले. आयुषचा गुन्हेगारी जगताशी काहीही संबंध नसतानाही सूड उगवण्यासाठी ही हत्या घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या घटनेत अत्यंत नियोजनबद्ध कट रचण्यात आला होता. आयुषवर गोळ्या झाडल्यानंतर परिसरात ‘टपका रे टपका, एक और टपका’ हे गाणे स्पीकरवर लावण्यात आले होते. त्यामुळे या हत्येची चर्चा संपूर्ण पुण्यात रंगली होती. आता या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार ठरलेला आयुषचा लहान भाऊ अर्णव कोमकरने पहिल्यांदाच थरारक घटनाक्रम सांगितला आहे.
अर्णव कोमकर सांगतो, त्या रात्री भाऊ मला क्लासमधून घरी आणायला आला होता. मला खाली सोडल्यानंतर तो गाडी पार्किंगमध्ये लावत होता. अचानक दोन जण धावत आले आणि फायरिंग सुरू केलं. जवळपास १२ गोळ्या झाडल्या, त्यापैकी ९ थेट भावाच्या शरीरात घुसल्या.

पहिल्या दोन गोळ्यांनंतर तो जमिनीवर कोसळला. मी पूर्ण गोंधळून गेलो. पोलिसांना यायला अर्धा तास लागला, ॲम्बुलन्स ४५ ते ५० मिनिटांनी आली. तोपर्यंत भावाचा देह तसाच रक्ताच्या थारोळ्यात पडून होता.
अर्णवच्या मते, सोसायटीतील एका डॉक्टरांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत खूप रक्तस्राव झाला होता. “पोलीस केस आहे, त्यांना कळवा असं डॉक्टरांनी सांगितलं. पण वेळेवर उपचार मिळाले नाहीत आणि आयुष्याचं आयुष्य संपलं.
गोळीबारानंतर पळताना मारेकऱ्यांनी मोठमोठ्याने घोषणा दिल्या. इथे फक्त कृष्णा आंदेकर आणि बंडू अण्णा आंदेकर चालणार, बाकी कोण नाही. जो आमच्या नादी लागणार त्याचं असंच होणार, असं ते म्हणाले होते, असं अर्णवने स्पष्ट केलं.
अर्णवच्या मते, आमची आंदेकर कुटुंबाशी पाच वर्षांपूर्वी भांडण झालं होतं. त्यानंतर आम्ही त्यांच्याशी संबंध ठेवले नाहीत. मात्र वनराज आंदेकरच्या हत्येनंतर त्यांनी आमच्यावर डोळा ठेवला. मामाच्या हत्येचा बदला घेणार अशी त्यांनी शपथ घेतली होती.
हीच शपथ पूर्ण करण्यासाठी आयुषला लक्ष्य करण्यात आल्याचं तपासात समोर आलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हत्येच्या आधी आरोपींनी रेकी केली होती. पण पोलिसांना माहिती मिळाल्याने पहिला प्लॅन फसला. अखेर ५ सप्टेंबरला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गँगने हल्ला घडवून आणला.