तीन वेळा रद्द झालेला जेजुरीतील ‘शासन आपल्या दारी’ आता सोमवारी! लाभार्थ्यांचे डोळे कार्यक्रम पुन्हा रद्द न होवो याकडे …!
पुणे : नागरिकांना शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ देण्यासाठी सोमवार ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता जेजुरी येथे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी कार्यक्रमस्थळाला भेट दिली. कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून विविध सेवा व योजनांचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तताही स्थानिक स्तरावर करून घेण्यात आली आहे.
कार्यक्रमस्थळी विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी दालने उभारण्यात येणार आहे. त्यासोबतच महिला बचत गटानी तयार केलेल्या उत्पादनांचेदेखील दालन असणार आहे. मुख्यमंत्री सहायता कक्षातर्फे नागरिकांची निवेदने स्वीकारण्याची सुविधाही येथे असणार आहे. याच ठिकाणी रोजगार मेळाव्याचेदेखील आयोजन करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील उत्पादनाची माहिती देणारे ‘मेक इन पुणे’ प्रदर्शन आणि आरोग्य शिबिराचे आयोजनही यावेळी करण्यात आले आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य तपासणी आणि उपचार करण्यात येतील. त्यासाठी वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.