उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून जगदीप धनखड कुठे आहेत? सुरक्षित आहेत का? नेमकं घडतंय काय?

मुंबई : देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तब्येतीच्या कारणावरून राजीनामा दिल्यापासून ते सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाहीत. 21 जुलैपासून धनखड कुठे आहेत हा प्रश्न आता विरोधकांकडून वारंवार उपस्थित केला जात आहे.

शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनामा आणि निघून जाण्यावर चिंता व्यक्त केली आहे. याबाबत संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक पत्र लिहिले आहे. १० ऑगस्ट २०२५ रोजी लिहिलेल्या या पत्रात राऊत यांनी उपराष्ट्रपतींच्या सुरक्षिततेबद्दल आणि सध्याच्या ठिकाणाबद्दल माहिती मागितली आहे.
संजय राऊत यांनी आपल्या पत्रात २१ जुलै रोजी झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, या दिवशी सकाळी ११ वाजता राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी कामकाज सुरू केले. कामकाजादरम्यान ते सामान्य आणि ठीक दिसत होते.

मात्र, संध्याकाळी ६ वाजेनंतर अचानक उपराष्ट्रपतींनी तब्येतीचे कारण देत आपल्या पदाचा राजीनामा दिला, अशी घोषणा करण्यात आली. ही बाब धक्कादायक होती, असे राऊत यांनी म्हटले आहे. यानंतर, राऊत यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ‘लापता उपराष्ट्रपती’ असा उल्लेख करत धनखड यांची खिल्ली उडवली. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा मुद्दा उचलत, माजी उपराष्ट्रपती कुठे आहेत? त्यांचे काय झाले? असे प्रश्न विचारले. राऊत यांनी चीन आणि रशियासारख्या देशांत विरोधकांना गायब करण्याची परंपरा असल्याचा आरोपही सरकारवर केला.