२८९ नगरपालिका, ३२ जिप, २९ महापालिका निवडणुकांचा बिगुल कधी वाजणार?, समोर आली मोठी माहिती…

पुणे : दिवाळीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध सगळ्यांनाच लागले आहेत. राजकीय पक्षांकडून स्थानिक पातळीवर चाचपणीस सुरुवात झाली असून ऐन हिवाळ्यात आता राजकारण चांगलंच तापणार आहे.

तसेच राज्यातील २८९ नगरपालिका, ३२ जिल्हा परिषद, २९ महापालिकांच्या निवडणुका कधी जाहीर होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून मोठी अपडेट समोर आली आहे.

दरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. नगरपालिकांच्या प्रभागनिहाय आरक्षणासह नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर झाले आहे. मतदार यादीही अंतिम करण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद मंगळवारी सायंकाळी किंवा बुधवारी दुपारी होणार आहे. या पत्रकार परिषदेनंतरच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पहिल्या टप्प्यात २८९ नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. तर, दुसऱ्या टप्प्यात ३२ जिल्हा परिषदा आणि ३३१ पंचायत समित्या, तर तिसऱ्या टप्प्यात २९ महापालिकांच्या निवडणुका होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने तयारीचा वेग वाढवला आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, महापालिकांच्या प्रभाग आणि महापौरांच्या आरक्षणाची घोषणा या महिन्याच्या अखेरीस केली जाण्याची शक्यता आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार, नगरपालिकांसाठी २१ दिवसांचा, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी ३० ते ३५ दिवसांचा, तर महापालिकांसाठी २५ ते ३० दिवसांचा निवडणूक कार्यक्रम ठरवला जाण्याची शक्यता आहे.
या निवडणूक कार्यक्रमात अधिसूचना प्रसिद्ध करून अर्ज भरण्यापासून ते मतदान आणि निकाल जाहीर होण्याचा कालावधी असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता राज्यात ५ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू होऊन राज्यात निवडणूक रणधुमाळीची अधिकृत सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
