पंचायत समिती सभापती अन् जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवड कधी होणार? अखेर तारीख जाहीर, ९ मार्चला सभापदी निवड, अन्…


पुणे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन दोन आठवडे उलटल्यानंतर अखेर पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडीचा मुहूर्त ठरला आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तास्थापनेची प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपली आहे.

येत्या ९ आणि १६ मार्च रोजी होणाऱ्या निवडींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ग्रामीण राजकारणाच्या दृष्टीने या दोन्ही तारखा अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. जिल्ह्यातील १६ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदांसाठी ९ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.प्रत्येक पंचायत समितीत संबंधित सदस्यांच्या उपस्थितीत ही निवडणूक होईल.

या प्रक्रियेसाठी अप्पर जिल्हाधिकारी पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. संपूर्ण निवड प्रक्रिया कायदेशीर तरतुदीनुसार, पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडली जाईल,अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यंदा अनेक पंचायत समित्यांमध्ये विविध राजकीय पक्षांचे संख्याबळ जवळपास समसमान असल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही ठिकाणी सत्ता कोणाच्या बाजूने झुकणार? याबाबत अनिश्चितता आहे.

परिणामी, आघाड्या, तडजोडी, गटबाजी आणि रणनीती आखण्याच्या हालचालींना वेग आला आहे. सभापती आणि उपसभापती पदांसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पडद्यामागील राजकीय घडामोडी तीव्र झाल्या आहेत. काही ठिकाणी अधिकृत आघाड्या स्पष्ट होत असताना, तर काही ठिकाणी अंतर्गत नाराजी आणि गटबाजीचे चित्र समोर येत आहे.

यानंतर १६ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीलाही अप्पर जिल्हाधिकारी पिठासीन अधिकारी म्हणून उपस्थित राहणार असून, संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार पार पडेल. जिल्हा परिषदेवरील सत्तास्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचे वर्चस्व असल्याचे चित्र आहे.

अध्यक्ष,उपाध्यक्ष आणि विविध विषय समित्यांच्या सभापतीपदांबाबत अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेणार असल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी पक्षांतर्गत संपर्क आणि रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षपदाला ग्रामीण प्रशासनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, ग्रामीण रस्ते विकास, महिला व बालकल्याण तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी यामध्ये अध्यक्षाची भूमिका निर्णायक असते. निधीचे वाटप, प्राधान्यक्रम निश्चिती आणि विकास आराखड्यांवर अध्यक्षांचा प्रभाव असतो. त्यामुळे या पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये,यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जाणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून,सर्व सदस्यांनी वेळेत उपस्थित राहून प्रक्रियेत सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, ९ आणि १६ मार्च या दोन तारखा पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद या दोन्ही स्तरांवरील सत्तास्थापनेनंतर पुढील काही वर्षांसाठी विकासाची दिशा ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!