महाराष्ट्राचे बजेट कधी सादर होणार? अजित पवारांकडून मोठी घोषणा, म्हणाले…

नवी दिल्ली : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सध्या अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थमंत्री म्हणून आपल्या आठव्या अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारामन यांनी देशातील कोट्यवधी जनतेला मोठी भेट दिली आहे. यावेळी विविध क्षेत्रांसाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.
अर्थमंत्र्यांनी उद्योग, आरोग्य, तंत्रज्ञानासह कृषी क्षेत्रासाठी मोठ्या तरतुदी केल्या. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना झुकतं माप देण्यात आलं आहे. तसेच गंभीर आजारावरील ३६ औषधे ड्युटी फ्री केली आहेत. केद्रींय अर्थसंकल्पानंतर आता लवकरच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे यंदाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. आता नुकतंच त्यांनी बारामतीमध्ये राज्याच्या अर्थसंकल्पाबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कधी जाहीर होणार याबद्दलचीही घोषणा केली आहे
अजित पवार म्हणाले की, मी केंद्राचं बजेट अजून ऐकलेलं नाही. पण तुमच्या राज्याचे बजेट मी मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात सादर करणार आहे. त्यावेळी माझा शेतकरी आणि सर्वसामान्य यांचा विचार करुनच अर्थसंकल्प मांडणार आहे. माझ्या लाडक्या बहिणींचाही मी विचार करणार आहे. तरुण तरुणींचाही विचार करुन हा अर्थसंकल्प सादर करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे, असे अजित पवार म्हणाले आहे.
मी तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम घेत आहे. जे पुणेकरांना मिळतंय ते बारामतीमध्ये मिळालं पाहिजे. बारामतीमध्ये आधुनिक मॉडर्न किचन निर्माण होत आहे. बारामतीकरांनो फलटण चे बाहेर येऊन बारामतीमध्ये व्यवसाय करत आहेत, असेही अजित पवार म्हणाले आहे.