लाडक्या बहिणींना १२ वा हफ्ता कधी मिळणार? आदिती तटकरे यांनी दिली माहिती, किती रुपये मिळणार?

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

अशातच आता राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या १२ व्या हफ्त्याची प्रतिक्षा करणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे की, रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हप्त्यांचे वितरण सुरू झालं आहे.
पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आदिती तटकरे यांनी सांगितले की, यंदा महिलांच्या खात्यात फक्त एकच हप्ता १५०० रुपये जमा केला जाणार आहे. गेल्या वर्षी मात्र, रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांचा एकत्र हप्ता म्हणजेच ३००० रुपये दिले गेले होते. यंदाही महिलांना वेळेत निधी मिळावा यासाठी यंत्रणा कार्यरत झाली आहे.

मंत्री तटकरे यांनी योजनेचा बोगसपणे लाभ घेणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचेही स्पष्ट केले. माहिती व तंत्रज्ञान विभागाने मिळवलेला डेटा सध्या तपासला जात आहे. येत्या १५ दिवसांत बोगस लाभार्थ्यांची यादी तयार केली जाईल. यामध्ये पुरुषांनी लाभ घेतल्याचे आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै २०२४ पासून सुरु करण्यात आली होती. आता या योजनेचा १२ वा हप्ता ऑगस्ट २०२५ मध्ये महिलांच्या खात्यात जमा होत आहे.