लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार? समोर आली महत्वाची अपडेट, जाणून घ्या..

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने हा निधी २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र विधानसभा निवडणुका होऊन दोन महिने झाले असले तरी, वाढीव रकमेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे २१०० रुपये कधी मिळणार हा प्रश्न वारंवार महिलांकडून विचारला जात आहे.
महायुतीतील अनेक नेत्यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर महिलांना २१०० रुपये मिळतील, असे संकेत दिले होते. परंतु, अद्याप कोणताही ठोस आदेश जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे महिला वाढीव हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. अशातच, राज्याचा अर्थसंकल्प ३ मार्च रोजी सादर होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ३ मार्चच्या अर्थसंकल्पात ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सकारात्मक घोषणा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार असल्याच्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, उलट आम्ही महिलांना अधिक आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.