पेट्रोल आणि डिझेल कधी स्वस्त होणार? पेट्रोलियम मंत्र्यांनी केलं स्पष्ट..
नवी दिल्ली : मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर मोठं वक्तव्य केलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करू शकते, असे सांगण्यात येत असलेल्या बातम्यांवर त्यांनी आपलं मतं व्यक्त केलं आहे. तसेच या संदर्भात ओएमसी आणि सरकारमध्ये बोलणी सुरू असल्याच्या मुद्यावर देखील मंत्री हरदीप सिंह पुरी आपलं मत व्यक्त केलं आहे.
भारत ८५ टक्के तेल आयात करतो
भारत सध्या तेल स्त्रोतांमध्ये विविधता आणण्यावर भर देत आहे. सध्या, भारत आपल्या तेलाच्या ८५ टक्क्यांहून अधिक गरजा भागवण्यासाठी आयातीवर अवलंबून आहे. पुरी म्हणाले की, भारत व्हेनेझुएलाचे तेल खरेदी करेल, भारतीय रिफायनरीज दक्षिण आफ्रिकेतील देशातून जड तेलावर प्रक्रिया करण्यास सक्षम आहेत. नवी दिल्ली कोणत्याही देशाशी तेल आयात पुन्हा सुरू करू शकते ज्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. आम्ही अशा परिस्थितीत आहोत की आम्ही दररोज ५ दशलक्ष बॅरल कच्चे तेल वापरत आहोत. ते दररोज वाढत आहे. व्हेनेझुएलाचे तेल बाजारात आले तर आम्ही त्याचे स्वागत करू असे मंत्री पुरी म्हणाले. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आलेखानुसार, नोव्हेंबर २०२१ ते नोव्हेंबर २०२३ दरम्यान, भारतात पेट्रोलच्या किमतीत ११.८२ टक्के आणि डिझेलच्या किमतीत ८.९४ टक्क्यांनी घट झाली आहे.
सरकारची तेल कंपन्यांशी कोणतीही चर्चा नाही
पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की, सरकारी तेल कंपन्या इंधनाच्या किंमती कमी करण्याबाबत केंद्र सरकारशी कोणतीही चर्चा करत नाहीत. सर्व मीडिया रिपोर्ट्स केवळ अनुमानांवर आधारित आहेत. त्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याची माहिती मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली. अशा कोणत्याही मुद्द्यावर सरकारची तेल कंपन्यांशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्ट केले. सध्या प्रचंड अशांततेचे वातावरण आहे. जागतील दोन प्रमुख भागांमध्ये संघर्ष सुरु आहे. त्यामुळं कच्च्या तेलाच्या किंमती अस्थिर आहेत. २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी सोशल मीडियावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, पुरी म्हणाले की, इंधनाच्या दरात कपातीचे हे वृत्त दिशाभूल करणारे आहे.
लाल समुद्रात तेलवाहू जहाजांच्या टँकरवर हुथींनी केलेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली होती. २६ डिसेंबर रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ८१.०७ डॉलरवर पोहोचली होती. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ९० डॉलरच्या जवळपास पोहोचेल असे वाटत होते, पण तसे झाले नाही. २६ डिसेंबरपासून ब्रेंट क्रूड तेलाच्या किमतीत सुमारे ७ टक्क्यांनी घसरण झाली आहे. दुसरीकडे, अमेरिकन कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ७० डॉलरच्या खाली गेली आहे. २६ डिसेंबरपासून कच्च्या तेलाच्या किमतीत ७ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.