गुढी पाडवा नेमका कधी 18 की 19 मार्च? तारखेवरून गोंधळू नका; जाणून घ्या नेमका मुहूर्त…

पुणे : गुढीपाडव्याला हिंदू धर्मात अत्यंत महत्वाचा सण मानले जाते. गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. यादिवशी कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केले जाते. नवीन वस्तू आवर्जून गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी केल्या जातात. गृहप्रवेश किंवा वास्तुशांती सारखे शुभ कार्य या दिवशी करतात.

गुढीपाडव्याला दारात सडा रांगोळी टाकून छान फुलांचे तोरण दाराला लावून गुढी उभारली जाते. या सणाचे धार्मिक,पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व देखील मानले जाते. त्यामुळे यंदा गुढीपाडवा केव्हा आहे याबाबत लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
हिंदू संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात मानली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याच्या तारखेबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

2026 मध्ये हा सण 18 मार्चला आहे की 19 मार्चला, असा प्रश्न अनेकांच्या मनात पडला आहे. पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदा तिथीला गुढीपाडवा साजरा केला जातो. यंदा प्रतिपदा तिथी 19 मार्च 2026 रोजी सुरू होत असल्याने महाराष्ट्रात गुढीपाडवा 19 मार्चलाच साजरा केला जाणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घराघरात गुढी उभारण्याची तयारी सुरू झाली आहे.
पंचांगातील माहितीनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा तिथीचा प्रारंभ 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी होईल. ही तिथी 20 मार्च रोजी पहाटे 4 वाजून 50 मिनिटांपर्यंत राहणार आहे. उदयतिथीच्या नियमानुसार सूर्योदयानंतर प्रतिपदा तिथी असल्यामुळे 19 मार्च गुरुवारी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे.
त्या दिवशी सूर्योदय सकाळी 6 वाजून 26 मिनिटांनी होईल. त्यामुळे सूर्योदयानंतर गुढी उभारणे अत्यंत शुभ मानले जाते. याशिवाय दुपारी 12 वाजून 04 मिनिटांपासून ते 12 वाजून 53 मिनिटांपर्यंत ‘अभिजित मुहूर्त’ असल्याने या वेळेतही पूजा किंवा इतर शुभ कार्य करता येऊ शकते.