पुण्याच चाललंय तरी काय?, पोलिसांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण, नेमकं घडलं काय?

पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं करणारी ही घटना घडली आहे. खडकी परिसरात पेट्रोलिंग करणाऱ्या दोन पोलिस शिपायांवर चार जणांनी हल्ला केला.
या हल्ल्यात पोलिसांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, पोलिस यंत्रणेला मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चारही आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये जुनेद इक्बाल शेख (वय.२७), नफीज नौशाद शेख (वय. २५), युनूस युसुफ शेख (वय. २५), आरिफ अक्रम शेख (वय. २५) यांचा समावेश आहे. खडकी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ३१ जुलै रोजी रात्री ९ च्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गावरील चर्च चौक, खडकी येथे घडली. पोलिसांनी एका वेडीवाकडी गाडी चालवणाऱ्या वाहनचालकाला थांबवून विचारणा केली, यावरून संतप्त झालेल्या चौघांनी पोलिसांवर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी पोलिसांना जमिनीवर पाडून जबर मारहाण केली.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून आरोपींना न्यायालयात हजर केलं आहे. न्यायालयीन कोठडीत त्यांची चौकशी सुरू आहे. पोलिसांवर हल्ला करणे हे अत्यंत गंभीर प्रकरण असून, अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावलं उचलावीत, अशी मागणी होत आहे