सातबारा कोरा कोरा कोरा’ च काय झालं? कर्जमाफीसाठी आता शरद पवार मैदानात, घेतला मोठा निर्णय…

मुंबई : महाराष्ट्रातील सरकार आलं खरं पण त्यांनी निवडणुकीत दिलेलं ‘सातबारा कोरा कोरा कोरा’ हे कर्जमाफीचं आश्वासन अजूनही अपूर्णच आहे. ना माझ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव ते कमी की काय म्हणून पीकविम्यात अफरातफर, माझा बळीराजा पीककर्ज मागायला गेला तर सिबिलचा अडथळा, बी बियाण, खतं महाग होणं, शेती साहित्य खरेदी-विक्रीत घोटाळा अशा अनेक समस्यांवर उपाययोजना करण्यापेक्षा सरकारकडून बळीराजाला झुलवत ठेवलं जात आहे.

दुसरीकडे अस्मानी संकटाने बळीराजा पार बेजार झाला असताना अवकाळी आणि अतिवृष्टीने उभी पीक आडवी झाली आहेत. शेतकऱ्याच्या शेतातच नाही तर डोळ्यातही पाणी तरळत आहे पण ह्या सरकारचे अंशतः, तत्त्वतः, निकष, अभ्यासगट, समित्या अशा गोष्टींमध्ये अडकलं आहे.
यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. असे असताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाने भव्य मोर्चाचे आयोजन केले असून यासाठी माजी कृषिमंत्री शरद पवार उपस्थित राहणार आहेत. याबाबत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, सर्वांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षातर्फे येत्या १५ सप्टेंबरला नाशिकमध्ये ‘आक्रोश मोर्चा’ पुकारण्यात आला आहे.

तसेच ते म्हणाले, आता बस्स झालं. एकमेकांच्या पायात पाय घालण्यात, जातीय धार्मिक राजकारणात अडकवण्यात असलेल्या महायुतीला जाग आणण्यासाठी आणि निर्वावलेल्या सरकारला दणका देण्यासाठी आपल्या ह्या मोर्चात स्वतः देशाचे नेते व माजी कृषिमंत्री खासदार शरदचंद्र पवार सहभागी होणार आहेत.
सोबतीला पक्षाचे आम्ही सर्व निष्ठावंत शिलेदार असणार आहोत. सोमवारी, १५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वा. नाशिक शहरातील गोल्फ क्लब मैदानावर आपण सर्वांनी एकत्र जमूया. आपल्या जगाच्या पोशिंद्यासाठी, आपल्या बळीराजासाठी एकत्र या असेही आवाहन शशिकांत शिंदे यांनी केले आहे.