त्या रात्री नेमकं काय घडलं?? लग्नाच्या पहिल्याच रात्री मुलगी माहेरी आली, बेडरुममध्ये झोपली, सकाळी सापडला मृतदेह…

Crime News : घरच्यांच्या विरोधात जाऊन एका २३ वर्षीय तरुणीने प्रियकराशी लग्न केले. रागाच्या भरात तरुणीच्या वडिलांनी आणि भावाने गळा दाबून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकी आली आहे. तरुणीच्या प्रियकराने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
नेमकं घडलं काय?
ग्रेटर नोएडाच्या चिपियाना गावात ही घटना घडली आहे. मृत तरुणीचे नाव नेहा आहे. नेहाचे तिच्या शेजारी राहणाऱ्या सूरज या तरुणाशी प्रेमसंबंध होते. दोघे शेजारी राहत असून एकाच शाळेत शिकले होते. शाळेपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. पण नेहाच्या कुटुंबीयांना त्यांच्या नात्याला विरोध होता. त्यामुळे नेहा आणि सूरज यांनी पळून लग्न करण्याचा निर्णय घेतला.
मंगळवार, ११ मार्च रोजी नेहा कपडे खरेदी करण्याचे कारण देत घराबाहेर पडली. गाझियाबाद कोर्टात जाऊन तिने सूरजशी लग्न केले.नेहाच्या भावाच्या एका मित्राने नेहा आणि सूरज यांना कोर्टात पाहिले. त्या मित्राने नेहाच्या भावाला याबद्दल कळवले. हे कळताच कुटुंबीयांनी नेहाला घरी बोलावले.
घरी गेल्यावर नेहाचा तिचा भाऊ आणि वडील यांच्याशी वाद झाला. त्यानंतर दोघांनी रात्री झोपेत नेहाला मारण्याचा कट रचला. दोघांनी मिळून नेहाचा गळा दाबून तिची हत्या केली. हत्येबाबत कोणाला शंका येऊ नये म्हणून त्यांनी लगेच नेहाचे अंतिम संस्कार देखील केले.
नेहाशी संपर्क न झाल्याने सूरजने पोलीस ठाण्यात धाव घेतली. बिसरख पोलीस ठाण्यातील एक पथक चिपियाना गावात पाठवण्यात आले. नेहाचा आजाराने मृत्यी झाला आणि त्यानंतर लगेच तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले.
याबाबत संशय आल्याने पोलिसांनी नेहाच्या वडील आणि भावाची चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांनी मिळून नेहाचा गळा दाबून तिची हत्या केल्याचे कबूल केले. ऑनर किलिंगच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.