काय सांगता! एका अंड्याची किंमत तब्बल ७२ रुपये, किंमत वाढण्याचे नेमकं कारण काय? जाणून घ्या…

Egg Price : एका अंड्याची किंमत ७२ रुपये झाली असं म्हणलं तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. अमेरिकेत एका अंड्याची किंमत ही ७२ रुपयांवर पोहोचली आहे. आपल्या जाचक धोरणांमुळे संपूर्ण जगात तणाव वाढवणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देशांतर्गत अंड्याच्या वाढत्या किंमतीचा सामना करावा लागत आहे.

अमेरिकेत अंडी महाग होत आहेत. अमेरिकेला सध्या बर्ड फ्लूचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं इथं अंड्यांचे भाव हे गगनाला भिडले आहेत. आगामी काळात अंडी आणखी महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यूएस ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात म्हणजेच जानेवारी 2025 मध्ये एक डझन ग्रेड A अंड्याची सरासरी किंमत $4.९५ डॉलर म्हणजे 429.91) रुपयांवर पोहोचली होती. ऑगस्ट २०२३ मध्ये हीच एक डझन अंड्यांची किंमत २.०४ डॉलर म्हणजे १७६.रुपये ४६ होती. यावरुनच आपल्याला किंमतीत किती वेगाने वाढ झाली आहे याचा अंदाज येतो.

दरम्यान, एव्हीयन इन्फ्लूएंझा म्हणजेच बर्ड फ्लूमुळं अंडी उत्पादनावर परिणाम झाला आहे. ज्यामुळं किंमतीत मोठी वाढ झाली आहे. जानेवारी २०२४ पासून अंड्याच्या किमतीत ६५ टक्क्यांची इतकी मोठी वाढ झाली आहे. काही भागात लाटेचा आकडा त्याहूनही जास्त आहे. येथे डझनभर अंड्यांची किंमत १० डॉलरम्हणजे ८६७.४२ रुपयांच्या पुढे आहे.
बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावामुळं कोंबड्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे. त्यामुळं अंडी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ ॲग्रीकल्चर च्या अहवालानुसार, २०२४ च्या शेवटच्या तिमाहीत २० दशलक्षाहून अधिक अंडी देणाऱ्या कोंबड्या मारल्या गेल्या आहेत. त्यामुळं अंड्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली असून लोकांचा खर्चही वाढला आहे.