बिहारमधील NDA च्या विजयाची प्रमुख कारणं काय?, समोर आली महत्वाची माहिती…

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत यंदा अपेक्षित नसलेला पण भव्य असा आकडा एनडीएनं गाठला आहे. तेजस्वी यादव यांच्या आक्रमक प्रचारामुळे महागठबंधनला मोठी हवा मिळाली होती, पण निकालांच्या पेटाऱ्यातून नरेंद्र मोदी आणि नीतीश कुमार यांच्या जोडीचं करिश्माई प्रदर्शन बाहेर आलं.

तसेच बिहारच्या २४३ जागांपैकी तब्बल २०३ जागा एनडीएच्या नावावर जमा झाल्या असून हा विजय त्सुनामीच ठरला आहे. विशेषत: बिहारमधील महिला मतदारांनी या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावली.

केंद्र आणि बिहार सरकारने राबवलेल्या योजना, थेट आर्थिक मदत आणि सुरक्षिततेबाबतचा विश्वास या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून एनडीएनं विक्रमी विजय मिळवला. तर दुसरीकडे, राजद-काँग्रेसच्या महागठबंधनाला जागा वाटपातील गोंधळ आणि कमकुवत नेतृत्व यांचा मोठा फटका बसला.

नरेंद्र मोदी आणि नीतीश कुमार यांची डबल इंजिन सरकार ही संकल्पना मतदारांना पटली. विकासाच्या प्रकल्पांची सातत्याने दिलेली हमी, पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक आणि मजबूत कायदा-सुव्यवस्था ही एनडीएच्या मोहिमेची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली. त्यातच जदयू-भाजपचे काटेकोर नियोजन आणि प्रत्येक मतदारसंघातील व्यवस्थापनामुळे NDA आघाडीने मतदारांपर्यंत विश्वासार्ह संदेश पोहोचवला.
महिला मतदार हा या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा घटक ठरला. महिला खात्यांमध्ये थेट जमा झालेले १० हजार रुपये, रोजगार योजनेचे १.५ कोटी लाभार्थी, तसेच ‘लाडकी बहीण’योजनेची प्रभावी अंमलबजावणी यामुळे महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान एनडीएच्या बाजूने वळवले. त्यात १२५ युनिट मोफत वीज, वृद्धांसाठी पेन्शन आणि विविध डीबीटी योजनांचा थेट परिणाम मतदानावर दिसून आला.
महागठबंधनची मोहीम सुरुवातीपासूनच विस्कळीत होती. शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटपावरून राजद आणि काँग्रेसमध्ये तणाव कायम राहिला. काँग्रेसने बिहारकडे ‘पार्टटाईम’ प्रचार म्हणून पाहिल्याचा प्रभाव थेट निकालावर उमटला. राहुल गांधींच्या तुलनेने कमी सभांमुळे आणि इतर काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे तेजस्वी यादव एकटेच संपूर्ण मोहिम चालवत असल्याचे चित्र दिसले.
लालू प्रसाद यादवांच्या घरातील मतभेद, तेजप्रताप यादव यांची वेगळी भूमिका आणि स्वतःच्याच भावावर टीका यामुळे आंतरिक अस्थिरता स्पष्ट झाली. महागठबंधनने स्थानिक मुद्द्यांऐवजी मतचोरीसारख्या आरोपांवर भर दिला, परंतु बिहारच्या मतदारांनी ते स्पष्टपणे नाकारले. रोजगार, स्थलांतर आणि विकासाच्या मुद्द्यांवर ठोस रोडमॅप मांडण्यात महागठबंधन अपयशी ठरलं आणि हीच गोष्ट त्यांच्या पराभवाचं मुख्य कारण ठरली.
